प्रशासकीयब्रेकिंग न्युज

समर्पित भावनेतून आरेाग्य सेवांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहाेचवून सेवा पंधरवडा यशस्वी करा : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दि. 17 (आठवडा विशेष वृत्तसेवा): देशाच्या सेवेसाठी अविरतपणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनामित्त 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेवा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी समर्पित भावनेतून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचविण्यात यावा, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा रुग्णलयात करण्यात आले. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. के. झा, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. सुनिल राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, रुग्णालय अधिसेविका वंदना वाघ यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भारती पवार म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविड महामारीच्या काळात डॉक्टर व शास्त्रज्ञांनी केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे आपला देश जगासाठी दिशादर्शक ठरला आहे. पंतप्रधान हे स्वत: डॉक्टर नसले तरी त्यांनी डॉक्टर व रुग्णांच्या अडचणी समजून घेवून त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून विकसित देश घडत असतो, या विश्वासाने शिक्षणक्षेत्रात युवा पिढीला अनेकविध नवीन संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात काम करतांना प्रत्येकाने हक्क व कर्तव्यांची व्यवस्थितरित्या सांगड घालून काम केल्यास आरोग्यदायी, निरोगी व बलशाली देश बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या सेवा पंधवड्याअंतर्गत जिल्ह्यात एकाच दिवशी 12 शासकीय रूग्णालयांमध्ये रक्तदान शिबिरे, 105 ठिकाणी नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबिराचेही आयोजन करण्यात करण्यात आले असून या आरोग्य मेळव्यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरबीएसके अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील ज्या बालकांना शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे, अशा सर्व बालकांची तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी वेळ देण्यात येणार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून उत्तम प्रतिच्या सेवा देण्याचा संकल्प करून सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात. तसेच प्रत्सेकाला या आरोग्य सेवा नियमितपणे मिळण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सुखाची व्याख्या करतांना आरोग्याला प्रथम स्थान देणे गरजेचे आहे. आपले आरोग्य चांगले असेल तर आपले विचार व हातून घडणारी कृती देखील चांगलीच घडते. त्यामुळे या शिबिरांमध्ये नागरिकांना चांगल्या व उत्तम दर्जाच्या आरोग्य देण्यात याव्यात. जेणे करून सशक्त भारताचे स्वप्न पाहतांना आपल्या जिल्ह्याचे स्थान अग्रस्थानी राहण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करून मानवतेची सेवा करावी. मानवतेचा संदेश देणारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ व पुण्याचे काम आहे. या पंधरवड्यात टप्प्या टप्प्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये देखील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ. भारती पवार यांनी केले.

याकार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन करून आरोग्य शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गरोदर माता व लहान बालके यांच्यासाठी चौरस, संतुलित व पोषक आहार याबाबत जनजागृती होण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी लावलेल्या प्रदर्शनाला देखील मंत्री व उपस्थितांनी भेट देवून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

000000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button