प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा

आठवडा विशेष टीम―

पुणे दि.१७: युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि‍ विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, पद्मभूषण सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, समाजाला सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र असल्याने आपल्याला स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासूनच चांगले लोकशाही राष्ट्र घडविण्याचा विचार करावा. जीवनात कोणत्याही परिस्थितीत निराश न होता उच्च ध्येय ठेवून वाटचाल सुरू ठेवावी.

छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना संसदीय लोकशाहीसाठी आवश्यक नव्या गोष्टी कळतील. सहभागी युवकांनी विविध विषयावर विचार करावा आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान कसे देता येईल याचा ध्यास धरावा. छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना चांगले मार्गदर्शन मिळेल आणि हा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना लोकशाहीला पुढे नेणाऱ्या युवकांशी संवाद साधताना आनंद होत असल्याचे सांगून समारोप भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताने जगाला विचारांनी जिंकले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेला पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करावे लागेल. सहिष्णुतेच्या आधारे एकमेकांना पुढे नेत विचारांची कटुता, भेदभाव बाजूला सारत भ्रष्टाचार समुळ नष्ट करूनच देशाला पुढे नेता येईल. देशाला युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहे. निडरता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विचारांच्या मुक्ततेसाठी आहे, आपल्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी आहे. भारताची संस्कृती जगातील पुरातन संस्कृतीपैकी एक आहे. जगातील जुने विद्यापीठ भारतात होते. त्यामुळे विकसीत भारत आणि विश्वगुरू भारताची कल्पना करताना आपला वैभशाली गतकाळ जाणून घ्यावे लागेल. आपल्या चुकीच्या कामगिरीमुळे आपण पारतंत्र्यात गेलो हे लक्षात घेऊन प्रत्येकाला उत्तमतेसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यातूनच आपण देशाला पुढे नेऊ शकतो.

क्षमता, विश्वास, युवाशक्ती, शक्यता, विचार आणि मूल्यांचा आधारे देश उभा रहातो. मूल्य जाणून घेतल्याशिवाय देशाला महान करता येणार नाही. सीमेवर लढणे सर्वांना शक्य होत नाही, नेतृत्व करणे प्रत्येकाला शक्य नाही. शक्य असलेल्या लहान कामातून आपण देशासाठी योगदान देऊ शकतो.

देशासाठी सर्वसमावेशक विकास महत्वाचा आहे. देशातील सर्व घटकांना सोबत घेऊनच पुढे जाता येईल. देशाची संपत्ती वाढविण्याचे प्रयत्न व्हायलाच हवे, पण त्यासोबत संसाधने अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हाच विकासाचा योग्य मार्ग आहे. भारत स्टार्ट अपच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. आज सामान्य व्यक्ती युनिकॉर्न तयार करून देशात संपत्तीची निर्मिती करताना अनेकांना रोजगार देतो, हीच देशाची खरी शक्ती आहे.

आज जगात आपल्याला मोठी शक्ती मानले जाते. आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहोत. अशा परिस्थितीती नव्या तरुणाईला मनुष्यबळात परिवर्तीत करणे गरजेचे आहे. त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत सहभागी करून घेणे आणि त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था पुढे नेली जाणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने देशाचे नवे शैक्षणिक धोरण उपयुक्त आहे. आपली शिक्षण पद्धती उपयोजित होत आहे. रोजगार देणारे मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. नवमाध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहेत. त्यांचा सम्यक उपयोग केल्यास सकारात्मक विचार समाजात पोहोचविता येतील असेही श्री.फडणवीस म्हणाले.

छात्र संसदेच्या माध्यमातून देशातील विविधतेचे दर्शन-गिरीष महाजन

मंत्री श्री.महाजन म्हणाले, छात्र संसदेच्या माध्यमातून भारतातील विविधतेचे दर्शन घडते आहे. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. सरासरी ३० वर्ष वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहेत. या युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी हे आयोजन उपयुक्त आहे. इथे ऐकलेले विचार व्यवहारात आणून युवकांनी देशकार्यासाठी योगदान द्यावे. लोकशाही व्यवस्था विकसीत करण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे. त्याग, निष्ठा आणि समर्पण भावनेने काम केल्यास तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांनी देशविकासात अधिकाधीक योगदान द्यावे आणि देशाला महाशक्ती बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवे स्वप्न घेऊन समाज घडवा-मीरा कुमार

श्रीमती मीरा कुमार म्हणाल्या, सामान्य, अतिसामान्य नागरिकांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यात सहभाग घेतल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. भौतिक प्रगती साधतांना मानसिक विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परिश्रम आणि विवेक एकमेकांशिवाय अर्थहीन आहेत आणि त्यासोबत स्वप्नही आवश्यक आहे. नव्या पिढीने नवे स्वप्न घेऊन समाज घडविण्यासाठी, वंचितांना त्यांचे हक्क देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

चारित्र्य निर्माण महत्त्वाचे – सुमित्रा महाजन

श्रीमती महाजन म्हणाल्या, चांगले कार्य आवश्यक आहे, पण त्यापेक्षाही चारित्र्य निर्माण महत्वाचे आहे. मन शुद्ध ठेवून कर्तव्य भावनेने पुढे गेल्यास जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल. राष्ट्रभावनेने कार्य केल्यास यश तुच्याकडे धावून येईल. आपल्या गुणांच्या आधारे समाजासमोर आपली प्रतिमा उभी रहाते आणि ती कायम रहाते हे लक्षात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीचा लौकिक जगात पोहोचवा – डॉ.विश्वनाथ कराड

डॉ.कराड म्हणाले, आपल्या पालकांना अभिमान वाटेल असे कार्य युवकांनी करावे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञान प्रगतीचा खरा मार्ग आहे. सुख, समाधान आणि शांतीचे नवे स्वरुप जगासमोर ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. मनाचे शास्त्र जाणण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कुटुंब आणि भारतीय संस्कृतीचा लौकिक जगात होईल असा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सर्वसमावेशक नेतृत्वाचा विकास करा-डॉ.रघुनाथ माशेलकर

श्री.माशेलकर म्हणाले, युवकांनी नेहमी उच्च ध्येय ठेवावे आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करावे. आपण केलेल्या विचाराचा, निश्चयाचा नेहमी ध्यास धरावा. स्वत: सर्वसमावेशक नेतृत्वाचा विकास करा. नव्या नेतृत्वाने नेहमी नवे ज्ञान, विचार, मूल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. युवकांनी नव्या विश्वासाने आणि उमेदीने आपल्या क्षेत्रात कार्यरत रहावे. आपल्या यशाला कोणत्याही मर्यादा नाहीत हा विचार मनात ठेवत निश्चित केलेल्या मार्गावर वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज पुणे मंगेश जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भारत लोकशाही राष्ट्र असून लोकशाहीची मूल्ये पुढे नेण्याचे कार्य युवकांचे आहे. भारताची मूल्ये जगात पोहोचवून आपण देशाच्या लौकिकात भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजनाला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी सहभागी युवकांनी देशासाठी योगदान देण्याची शपथ केली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button