प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि.१९ : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्यात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सीओईपी संचालक प्रा. डॉ. मुकुल सुतावने, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गीते, मानद सचिव प्रा. एस.एस. परदेशी आदी उपस्थित होते.

सीओईपीच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले, येथून विश्वविख्यात अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्यासह आपल्या क्षेत्रातील उच्च व्यक्तिमत्वे घडली. त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना त्या माध्यमातून देशासाठी काम करावे. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संपूर्ण जग भारताकडे आशेने पहात आहे. जगामध्ये आपापसात सहयोगाचे युग आले असून त्याचा लाभ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, सध्याचे युग हे कृत्रिम प्रज्ञा (एआय), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि सायबर क्षेत्राचे असल्याने या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम करावे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक तरतुदी आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास रचना केल्यामुळे विद्यार्थ्यांना एका क्षेत्रात शिक्षण सुरू असताना मध्येच त्याच्या आवडीप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाकडे वळता येईल. या तरतुदींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

सामाजिक दायित्व जपत संस्थेसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची भूमिका ठेवल्याबद्दल सीओईपीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कौतुक करत भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

प्रतापराव पवार म्हणाले, या संस्थेचा मोठा इतिहास असून येथील विद्यार्थी शिक्षण घेत असताना ज्ञानाची निर्मिती करतात. महाविद्यालयाचे विद्यापीठामध्ये रूपांतर झाल्यामुळे ते ज्ञाननिर्मितीचे विद्यापीठ बनणार आहे. आपण देशातील नव्हे तर जगातील उत्तमोत्तम विद्यापीठाशी स्पर्धा करायला हवी. संस्थेला शासनानेही मोठे सहकार्य लाभत असून १५० कोटी रुपयांचा निधी तसेच नवीन कॅम्पस साठी ३० एकर जागा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत अभ्यासरचनेद्वारे भविष्य घडवावे, असेही त्यांनी आवाहन केले.

भारत गीते यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली.  माजी विद्यार्थी संस्थेच्या विकासासाठी तसेच शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भरीव आर्थिक मदत जमा करतात. १५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या कार्यक्रमासाठीच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. गौर गोपाल दास यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जीवनविद्या प्रशिक्षक गौर गोपाल दास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे संस्थापक अध्यक्ष व संचालक जगदीश कदम, लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सतीश खंदारे, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै, ‘एस्सार ऑइल अँड गॅस’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास तावडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी  या प्रसंगी सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन, तसेच संस्थेच्या इतिहास व घडामोडींवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button