प्रशासकीयब्रेकिंग न्युज

लम्पी चर्मरोग – खबरदारी, लसीकरण, वेळीच औषधोपचार हाच उपाय

आठवडा विशेष टीम―

सद्या देशात मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची साथ आली आहे. आपल्या जिल्ह्यातही या रोगाचा प्रसार होत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 118 इतक्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून यामुळे  तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 जनावरे या रोगातून बरीही झाली आहेत.  वेळीच निदान व योग्य उपचार यामुळे लम्पी चर्मरोगापासून जनावरांचा बचाव करता येतो. यासाठी पशुपालकांनी सजग राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. या रोगाचे संक्रमण माणसांमध्ये होत नसल्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

लम्पी चर्मरोग हा कॅप्री पॉक्स विषाणूमुळे होतो. गोट पॉक्स (शेळ्यातील  देवी ) आणि  शिप पॉक्स (मेंढ्या तील  देवी ) या विषाणूच्या  समुहातील  हा विषाणू आहे. प्रामुख्याने गायी, कमी  प्रमाणात  म्हैशी यांना बाधीत करतो, शेळ्या व मेंढ्यांना अजिबात होत नाही.

रोगाचा प्रसार – परजीवी कीटक (डास, माशा, गोचीड), बाधित जनावराच्या नाकातील/डोळ्यातील श्रावाने दूषित चारा/ पाणी, जनावरांची वाहतूक, बाधित पशुचे वीर्य यापासून होतो.

 

लम्पी चर्मरोगाच लक्षणे – बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2 ते 14 दिवस एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येते.  ताप येतो, दुग्ध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू 10-50 मि. मी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळयात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते. या आजाराच्या प्रादुर्भावामध्ये फुफ्फूसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा होवू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सुज येवून काही जनावरे लंगडतात.

        लम्पी चर्मरोग आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना – बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवू नये. हा आजार संसर्गजन्य असल्याने लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तसेच टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधावा.  बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता एक टक्के फॉर्मलीन किंवा 2-3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करता येईल. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. निरोगी जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय  वर्गातील जनावरांना लसीकरण तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात 100 टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.

लम्पी स्किन रोग नियंत्रणासाठी प्रशासनामार्फत बाधित पशुधनांचे अलगीकरण करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर शासकीय/निमशासकीय पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून औषधोपचार सुरू आहेत. बाधित गावातील सर्व पशुपालकांमध्ये रोगाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. बाधित पशुधनाच्या संपर्कात गावकरी व इतर पशुधन येणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. बाधित गावांमध्ये किटक नाशक फवारणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने झालेली आहे. बाधित गावांपासून 5 किमी अंतरावरील त्रिज्येच्या गावांमधील पशुधनास व बाधित गावांमधील निरोगी पशुधनास रिंग पद्धतीने (बाहेरून आत या पद्धतीने) Goat Pox vaccine चे लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे.

सांगली जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत 1 लाख 63 हजार 100 लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. आत्तापर्यंत 88 हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची वाहतूक करणे, जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करणे, बैलगाडी शर्यतीचे तथा पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करणे इ. बाबींना सक्त मनाई केली आहे. तसेच संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या आजाराचा प्रतिबंध व परिणामकारक नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

हेमंत चव्हाण

माहिती सहाय्यक

जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button