प्रशासकीयब्रेकिंग न्युज

लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 20 : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री सिंह म्हणाले, लम्पी आजार केवळ जनावरांमध्ये आढळून येतो. देशातील आकडेवारीमुळे तसेच समाजमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी.

लम्पीबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४(१) नुसार जनावरात या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संबंधित माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. गावस्तरावरून अशी माहिती संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांनी न चुकता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयास कळवावी. लम्पी चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घेण्याचे पशुपालकांना आवाहन करण्यात आले आहे.

लम्पी हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो. सध्या या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र त्यांनी लम्पी रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.

राज्यामध्ये दि. २० सप्टेंबर, २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर हिंगोली व रायगड अशा २७ जिल्ह्यांमधील एकूण १२२९ गावांमध्ये फक्त ११,२५१ जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यापैकी ३८५५ जनावरे उपचाराच्या माध्यमातून रोगमुक्त झाली आहेत.

उर्वरित बाधितांसाठी लसदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. २० रोजी २५ लाख लस मात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगाव १२२, अहमदनगर ३३, धुळे १२, अकोला ५४, पुणे २५, लातूर ५, औरंगाबाद ८, सातारा १५, बुलडाणा २५, अमरावती २९, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम ४, जालना २, ठाणे ३, नागपूर ३ व रायगड १ अशा ३५२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

दि. २० रोजी रोग प्रादुर्भावग्रस्त ८ जिल्ह्यामधील गंभीर जनावरांवर उपचार व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील भीषकशास्त्रातील तज्ज्ञांची १९ पथके नियुक्त करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील ६ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ दररोज सायं ४ ते ५ दरम्यान दृकश्राव्य माध्यमांद्वारे अधिकाऱ्यांना गंभीर प्रकरणांबाबत मार्गदर्शन व उपचारामध्ये मदत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button