उद्योजकांच्या समस्या ‘संकल्प’ प्रकल्पाद्वारे केंद्र शासनाकडून सोडविले जातील

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, २१ : राज्यातील कृषी, ऑटोमोबाईल, उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना उद्भणाऱ्या समस्या ‘संकल्प’ प्रकल्पाद्वारे केंद्राकडून सोडविल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिले असल्याची माहिती उद्योग मंत्री  उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांना येणाऱ्या समस्यांसाठी ‘संकल्प’ प्रकल्प तयार केला असून याद्वारे केंद्र शासनाकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.

राज्यात ९ लॉजिस्टिक्स पार्क

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात ९ लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा निर्णय श्री.गडकरी यांनी घेतला. यानुसार नाशिक, जळगाव, सांगली, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, भिवंडी, पुणे येथे लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येतील. हे प्रकल्प सुरू झाल्यास त्या-त्या जिल्ह्यातच उद्योगांना सुविधा उपलब्ध होतील. तसेच या प्रकल्पासाठी सर्व खर्च केंद्र शासन करणार असून राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नाही. फक्त राज्याला यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार असल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी येथे जागतिक दर्जाची बंदरे आहेत. येथील रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याबाबत प्रलंबित असलेल्या विषयावर आज श्री. गडकरी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत निणर्य घेण्यात आला असून येत्या दोन महिन्यांमध्ये या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

संपूर्ण कोकण पट्टीला ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ अंतर्गत  आणण्यात आलेले आहे. यामुळे स्थानिक लोकांचे व्यवसाय गमावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील लोकांची वाताहत होऊ नये म्हणून पर्यावरणाशी निगडीत काही नियम शिथिल करावे, अशी विंनती केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन केली असल्याची, माहिती श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री.यादव यांनी दिले, असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेऊन उद्योग आणि रेल्वे विभागाशी संबंधित विविध विषयाबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या रेल्वेस्थानकावर थांबा मिळण्याची मागणी यावेळी केली असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.