जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबवावे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 23 : प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी दिल्या.

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची जागतिक प्राणी दिन साजरा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

श्री. निवतकर म्हणाले, काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. लहान- मोठ्या, पाळीव-भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यामध्ये समावेश होतो. आपणही जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना चित्र स्वरुपात सादरीकरण करुन जागृत करावे. सोसायटीच्या सर्व सदस्यांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस, पशुसंवर्धन विभाग तसेच प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात मार्गदर्शिका तयार करावी. यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा. तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे. प्राणी लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी विविध भाषेतील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश पेठे, मुंबई पशुवैद्यकीय महाव्यवस्थापक डॉ. क.अ.पठाण, मुंबई शिक्षण विभागाचे राजेंद्र पाटील, निसार खान, विनोद कदम व शुभांगी बेटे यांची यावेळी उपस्थिती होती.

000000

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.