वरळी-शिवडी उन्नत मार्ग बाधितांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 24 :– ‘विकास कामे करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही. त्यामुळे वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधितांच्या सर्व अडचणी समजून घेऊन, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यावर उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रभादेवी परिसरातील कामगार नगर 1 व 2 आणि गणेशनगर या भागाची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर ते उपस्थित नागरिकांशी बोलत होते.

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे आमदार सर्वश्री सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच प्रकल्प अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधितांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आज जाणीवपूर्वक हा पाहणी दौरा केला. गेली काही वर्षे या रहिवाशांच्या संक्रमण शिबीर, घरांचे भाडे, पुनर्वसन आणि पुनर्विकास यांच्याशी निगडित अडचणी प्रलंबित आहेत. त्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने उपाययोजना केल्या जातील. झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रकल्प, योजना रेंगाळू नयेत यासाठी प्रयत्नशील आहोत. यात केंद्र आणि राज्य मिळून पुनर्विकासाबाबत एकत्रित आणि समन्वयाने प्रयत्न करु. स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ उभे करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या रहिवाशांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यात सेंच्युरी मिल येथील संक्रमण शिबिरात व्यवस्था, तातडीने भाडे देणे याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली. विशेषतः प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्थानिक रहिवाशांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यांचे म्हणणे समजून घेतले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.