आठवडा विशेष टीम―
इंटरनॅशनल टूर करून महाराष्ट्राचे युवा खेळाडू नॅशनल गेम्समध्ये सहभागी
क्रीडा प्रतिनिधी | पुणे : वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, ऑरेंज सिटी नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोडे यांच्या सहभागामुळे महाराष्ट्र संघाचा ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये मोठा दबदबा राहणार आहे. याशिवाय देशातील नंबर वन युवा बॅडमिंटनपटू सिमरन आणि अपुर्वाही या स्पर्धेत पदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून नॅशनल गेम्समध्ये बॅडमिंटनच्या इव्हेंटला सुरुवात होणार आहे. यादरम्यान महाराष्ट्राचा संघ स्पर्धेत सहभाग होईल.
‘आंतरराष्ट्रीय दौरे करून महाराष्ट्राचे युवा बॅडमिंटनपटू हे नॅशनल गेम्समध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राचा पदकाचा दावा अधिक मजबुत आहे. यातून महाराष्ट्राला या स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवता येईल. चिरागचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव हा संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक अक्षय देवळकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बॅडमिंटन संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
चिराग फॉर्मात; संघ दावेदार :
महाराष्ट्राचा चिराग शेट्टी हा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने नुकत्याच झालेल्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपला सहकारी सात्विकराजसोबत दुहेरीत पदक जिंकले. यासह त्याने भारताला विक्रमी पदक मिळवून दिले. त्यानंतर त्याने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही पदकाची कमाई केली. याच सर्वोत्तम कामगिरीमुळे आता त्याच्याकडून संघाला मोठ्या यशाची आशा आहे.
मालविकाचा दबदबा :
नागपूरची गुणवंत युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोडे यंदाच्या सत्रात सर्वोत्तम कामगिरीमुळे फॉर्मात आहे. आता ती महिला एकेरीच्या गटात पदकाचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज आहे.
सिमरन, अपुर्वाही दावेदार : देशातील नंबर वन युवा बॅडमिंटनपटू सिमरन सिंगी आणि अपुर्वाही आपापल्या गटात पदकाच्या दावेदार आहेत. या दोघींची ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमधील कामगिरीही उल्लेखनीय ठरली होती.