आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २६ :- आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाकडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” हे विशेष अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, शारदीय नवरात्रोत्सव आपल्या मातृभक्त संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मातृशक्ती आणि स्त्री शक्तीचा जागर करण्याचा,तिच्या समोर नतमस्तक होण्याचा उत्सव आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आजपासून आपण “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” हे विशेष अभियान राबविणार आहोत. ५ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी रहावी,जागरूक रहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी अशी विनंती. या नवरात्रोत्सवातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास, समृद्धी करिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया. त्यासाठी सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा.”
000