प्रशासकीयब्रेकिंग न्युज

बी.ए.पी.एस. स्वामीनारायण सांप्रदायामुळे भारतीयांच्या विचार आणि संस्कृतीला लाभला वैश्विक आयाम

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दिनांक २८ सप्टेंबर ,२०२२ (आठवडा विशेष वृत्तसेवा) :- बी.एस.पी.एस. स्वामीनारायण सांप्रदाय हा आपल्या १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतीयांचे विचार आणि संस्कृतीला या सांप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

येथील बोचासनवासी अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्था (बी.ए.पी.एस.) मंदिराच्या वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठाविधी समारंभात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भु्से, खासदार हेमंत गोडसे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सिमा हिरे,राहुल ढिकले, सुहास कांदे, स्वामीनारायण संस्थेचे प्रेरम् पूज्य महंत स्वामी महाराज, सद्गुरू संत कोठारी बाबा(भक्तिप्रियदास),विवेक सागर महाराज  उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि गोदावरीच्या पवित्र तीरावर साकारलेले हे स्वामीनारायण मंदीर म्हणजे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि जगभरातून येथे येणाऱ्या तीर्थयात्री, पर्यटक यांच्यासाठी अभिनव व  अध्यात्मिक आकर्षणाचे प्रमुख केंद्र झाले आहे. १९ ४३ साली ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराजांनी नाशिकच्या गोदातिरी भव्य मंदीर उभारणीचा संकल्प केला होता. तो संकल्प आज या मंदिराच्या रूपाने सत्यात प्रकटला आहे. हे मंदीर स्वामीनारायण यांच्या विचारातून साकारलेल्या कलाकृतींपैकी एक सुंदर नमुना आहे, तसेच अशा अध्यात्मिक वास्तू, सेवा व त्यागांच्या विचारांतून  समाजाला जोडण्याचे काम स्वामीनारायण सांप्रदायाच्या माध्यमातून जगभर केले जात आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले असून ते जनतेची सेवा, विकासासाठी अहोरात्र कार्य करते आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आशीर्वाद व प्रेरणा सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे सेवा, विकासाचे ध्येय गाठण्यासाठी,लोकोपयोगी योजनांच्या आखणीसाठी, सुख-शांतीसाठी  प्रसंगी स्वामीनारायण सांप्रदायाच्या आचार,विचार आणि कृतीची जोड सरकारच्या कार्याला दिली जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शिलान्यास ते मुर्तीप्रतिष्ठा हा मला लाभलेला आशीर्वाद

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी या मंदिराच्या शिलान्यास व भूमीपूजनासाठी मी ११ नोव्हेंबर, २०१७ ला राज्याचा कॅबिनेट मंत्री या नात्याने उपस्थित होतो. आज याच मंदिराच्या वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठा विधीस मी मुख्यमंत्री म्हणून उपस्थित आहे, हे माझे भाग्य तर आहेच त्याचबरोबर अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण महाराज यांचा तो मला लाभलेला आशीर्वादच आहे, असे सांगून दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध असतानाही अवघ्या तीन वर्षात हे मंदिर उभारून महाराष्ट्राला एक अनोखे मंदिरशिल्प दिल्याबद्दल त्यांनी बा.एस.पी.एस. स्वामीनारायण संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी परम् पूज्य महंत स्वामी महाराज यांनी आपल्या मनोगतातून देशात सुख-शांती कायम असेल तरच विकास साधला जाईल, देश पुढे जाईल, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी बी. ए. पी.एस. स्वामीनारायण संस्थेच्या वतीने स्वामी निलकंठवर्णी महाराज यांची धातू प्रतिमा, पुस्तके देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button