निर्यातदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 28 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनांच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई शहर अतिरिक्त जिल्हाधिकारी  तथा या उपक्रमाचे अध्यक्ष रामदास खेडकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी अतिरिक्त उद्योग संचालक सुरेश लोंढे, उद्योग सह संचालक काशिनाथ डेकाटे तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर उपस्थित होत्या. महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी. आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई येथे उद्यापर्यंत (29 सप्टेंबर)  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्त्वाचा मापदंड आहे. त्याअनुषंगाने गुंतवणूक वृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन आहे.

आज संपन्न झालेल्या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियम, बँकेचा सहभाग, उद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहिती, निर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतुदी,  निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक सवलती, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँकेचे प्रतिनिधी इत्यादींनी मार्गदर्शन केले.

या दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील निर्यातदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

  • महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणारे राज्य आहे.
  • संपूर्ण देशातून होणाऱ्या निर्यातीत राज्याचा १७.३३ टक्के एवढा वाटा आहे.
  • सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुमारे ३२ लाख कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.
  • मुंबई उपनगर, मुंबई, पुणे या तीन जिल्ह्यांतून सर्वाधिक निर्यात होते.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/28.9.22

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.