प्रशासकीयब्रेकिंग न्युज

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

आठवडा विशेष टीम―

लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा हा  ऐतिहासिक क्षण; या महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संगीत महाविद्यालयातून भारतीय, वैश्विक संगीत शिकता येणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २८ : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  आज रविंद्र नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन २०२० चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर सन २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, मीनाताई खडीकर, पद्मश्री सोनू निगम, आदिनाथ मंगेशकर,  संगीतकार मयुरेश पै, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा, ज्येष्ठ गायक पंकज उधास, ज्येष्ठ गायक रूपकुमार राठोड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय  यांच्यासह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य हस्ते उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.

➖➖➖➖

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  लतादीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर हृदयात घर करून आहे, मराठी मातीमध्ये जन्मलेले हे रत्न अवघ्या भारत देशाचे झाले. करोडो रसिकांच्या मनात त्या एक दंतकथा म्हणून राहिल्या होत्या त्यांचा स्वर कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही असे सांगून त्यांनी स्वरमाऊलीला अभिवादन केले. दिदींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे आज वितरण झाले. या पुरस्काराच्या जोडीनं यासाठी पावले टाकली, गेल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आम्ही निर्णयही घेतला. या महाविद्यालयासाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात पु.ल.देशपांडे कला अकादमीची जागा उपलब्ध करून दिली असून ग्रंथालय संचालनालयाची कालिना येथील 7 हजार चौरस मीटर जागा कला संचालकांकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

आज दोन वर्षांचे पुरस्कार ज्यांना प्रदान केले जात आहेत, त्या ज्येष्ठ गायिका उषाताई, आणि ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसादजी ही दोन्ही नावं नतमस्तक व्हावीत अशीच आहेत.  त्यांनी आपल्या नावानंच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे आणि अजूनही गाजवताहेत. या दोन्हीही महान कलाकारांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

उषाताईंनी केवळ हिंदी आणि मराठीच नाही; तर वेगवेगळ्या प्रांतांतल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गाऊन त्यांनी स्वत:ला तर जोडलेच पण खऱ्या अर्थानं ‘भारत  जोडो’ केला.  पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्तानची ओळख आहे.त्यांच्या बासरीने देशाच्या सीमांच्या भिंती तोडण्याची शक्ती असून नित्य नवे शिकण्याचा त्यांचा संकल्प कौतुकास्पद असल्याचेही कौतुकोदगार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण हे वेगवेगळ्या कलांना आधार देणारे, प्रोत्साहन देणारे तितकेच भक्कम असावे असा सरकारचा प्रयत्न आहे. मान-सन्मान आणि कलावंताच्या मदतीसाठी सदैव सज्ज आणि सतर्क आहोतच आहोतच मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर पडावी. जगाने आपल्या महाराष्ट्राच्या कलावंतावर कौतुक, आदर-सन्मानाची पखरण करावी यासाठी आम्ही कुठंही मागे राहणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

संगीत महाविद्यालयातून भारतीय, वैश्विक संगीत शिकता येणार; जागतिक स्तरावर या महाविद्यालयाची कीर्ती पसरेल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनी आज हे संगीत महाविद्यालय सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. उषाताईंनी आवाज आणि चित्राच्या माध्यमातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं तर पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीने आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या. पंडीत नेहरूंप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लता दीदींच्या स्वराची भुरळ पडली. ईश्वराचे रूप मानल्या जाणाऱ्या स्वर, सूर, ताल यांचा सुंदर मिलाफ दीदींच्या आवाजात होता असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय महाविद्यालय सुरू होणे गरजेचे होते ते आज सुरू झाले आहे. या महाविद्यालयातून भारतीय आणि वैश्विक संगीत शिकता येणार असून जागतिक स्तरावर या महाविद्यालयाची कीर्ती पसरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाविद्यालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वडिलांच्या आणि दीदींच्या नावाने सर्वोच्च पुरस्कार मिळाले-उषा मंगेशकर

सत्कार स्वीकारल्यानंतर उषा मंगेशकर म्हणाल्या की, मला आजपर्यंत  महाराष्ट्रासह अनेक राज्यांकडून पुरस्कार मिळाले. पण माझ्या वडिलांच्या म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा आणि भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हे दोन सर्वोच्च पुरस्कार आहेत, असे मी मानते. आजपर्यंत ज्यांना दीदींच्या नावे पुरस्कार मिळाला त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

पुरस्काराने मान-सन्मान मिळाला – पंडित हरिप्रसाद चौरसिया

पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले की, लता दीदी या सुरांची महाराणी होत्या आणि त्यामुळे मी त्यांच्या गायनाचा काल, आज आणि उद्याही भक्त राहणार आहे. या पुरस्काराने मला मान- सन्मान मिळाला असून राज्य शासनाचा आभारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आदिनाथ मंगेशकर म्हणाले की, आज सुरू झालेले महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर व्हावे. येणाऱ्या काळात हे महाविद्यालय संगीताची गंगोत्री बनेल असा विश्वास व्यक्त करून लता दीदी यांच्या जयंतीदिनी हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.

‘स्वर-लता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वर-लता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक हरिहरन, ज्येष्ठ सितारवादक निलाद्री कुमार व गायक अभिनेत्री आर्या आंबेकर आणि इतर कलाकार आपली कला सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button