चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. 29 : मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

चांदणी चौक पूल पाडण्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजीव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आदी उपस्थित होते.

चांदणी चौकात होणारी वाहतुकीचा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौक येथे एकात्मिक संरचना पूल प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अस्तित्वातील जूना पूल पाडण्यात येणार असून महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती तसेच त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून पूलासाठीच्या भूसंपादनाचे काम पूर्ण करणे, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. आता हा पूल पाडण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण होत आली असून त्याबाबतची आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यखतेखाली घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्याद्वारे समन्वयाने वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पूलाच्या पाडकामावेळी देण्यात यावा. वाहतूक बंद कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहने उर्से पथकर नाका येथे थांबवण्यात येणार असून साताराकडून मुंबईकडे येणारी वाहने खेड शिवापूर पथकर नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग व वाहतुकीचे नियमन तीनही पोलीस दलांनी समन्वयाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

या मार्गावरील दिवसाच्या वाहतुकीचे प्रमाण पाहता नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रात्री हा पूल पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रात्री ११ वा. वाहतूक बंद केल्यानंतर सुमारे पहाटे २ वा. स्फोटकांद्वारे ब्लास्ट करण्यात येईल. ब्लास्ट करण्यासाठी सुमारे दीड मीटरची १ हजार ३०० छिद्रे घेण्यात आली असून त्यामध्ये सुमारे ६०० कि. ग्रा. स्फोटके वापरण्यात येणार आहेत. स्फोटकांसाठी पोलीस विभागासह सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. पूलाचा २०० मीटर परीघातील परिसर ब्लास्टपूर्वी रात्री ११ वा. च्या नंतर पूर्णत: निर्मनुष्य करण्यात येणार आहे.

पाडकामाच्यावेळी सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठी तसेच रात्री कामावर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण पूल दिव्यांच्या सहाय्याने प्रकाशित करण्यात येणार आहे. राडारोडा काढण्यासाठी ४ डोझर्स, ८ पोक्लेन, ३९ टिपर तसेच सुमारे १०० कर्मचारी लावण्यात येणार असून ब्लास्टनंतर ३० मिनीटात तेथील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सुरक्षिततेची खात्री करुन राडारोडा काढण्यास सुरूवात करण्यात येईल. सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण राडारोडा काढला जाऊन मार्ग वाहतूकीसाठी खुला केला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे ८ दिवसात अतिरिक्त मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे.

महामार्ग पोलीस अधीक्षक लता फड, एडीफीस इंजिनिअरींग मुंबईचे उत्कर्ष मेहता यांच्यासह पोलीस विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.