राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडे मुबलक निधी – केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल

आठवडा विशेष टीम―

शिर्डी, दि.३० सप्टेंबर (उमाका वृत्तसेवा)  – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी  केंद्र सरकार कटीबद्ध आहे. विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे‌. अशी माहिती देशाचे अन्नप्रक्रिया उद्योग व जल शक्ती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज येथे दिली.

संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत च्या राष्ट्रीय महामार्ग क्र ६० घुलेवाडी ते संगमनेर रस्ता  तसेच राज्यमार्ग क्र. ७१ अ राष्ट्रीय महामार्गाच्या ६० किलो मीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याहस्ते आज संगमनेर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेंद्र गोंदकर, रविंद्र अनासपुरे, नितीन दिनकर, सुनिल वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.पटेल म्हणाले, देशात गावा-गावांना जोडणारे पक्के रस्ते निर्माण झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान सडक योजनेमुळे देशात रस्त्यांचे पथदर्शी काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशाला नवीन २० योजना दिल्या आहेत. त्यामाध्यमातून देशात मुलभूत व  पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे.  २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था २ किंवा ३ स्थानी असणार आहे‌.

अन्न प्रक्रिया व जलशक्ती मंत्रालयाचे बजेट ६० हजार कोटींचे आहे.यातील १० हजार कोटी अन्न प्रक्रिया उद्योगांना मदतीसाठी खर्च केले जाणार आहेत. जलजीवन मध्ये प्रत्येक व्यक्तीला २०२४ पर्यंत प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे‌. जलजीवनमध्ये आतापर्यंत १८ हजार कोटी खर्च करण्यात आला आहे‌. लोकांना योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांच्या समस्या ही समजून घेतल्या जात आहेत. असेही श्री.पटेल यांनी सांगितले.

देश प्रगतीच्या महामार्गावर – महसूलमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमुळे देश काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत प्रगतीच्या महामार्गावर आहे. देशात रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे‌. असे मत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व  दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

संगमनेर येथील या राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व‌ चौपदरीकरणाच्या कामांसाठी केंद्र सरकारने २४ कोटी ५६ लाख व राज्य सरकार ७ कोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्याच्या विकासासाठी केंद्राच्या निधीचे मोठे योगदान असते. असे मतही महसूलमंत्री श्री.विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.