माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

आठवडा विशेष टीम―

सातारा दि 30:  राज्य शासनाने महिलांच्या आरोग्याला  प्राधान्य दिले असून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे आरोग्य तपासणी अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान आरोग्य विभागाने 18 वर्षावरील सर्व महिलांपर्यंत पोहाेचून आरोग्य तपासणी करावी व हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

येथील स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य तपासणी अभियानाचा शुभारंभ श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील मुलींचा जन्म दर कमी होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे. मुलींचा जन्म दर वाढावा यासाठी गर्भलिंग चाचण्यांवर निर्बंध तसेच कडक नियमावली आहे याची कडक अंमलबजावणी करावी. रस्त्यांच्या कामावर, बांधकामावर महिला दिसत आहेत त्यांचीही आरोग्य विभागाने तपासणी करावी.

सर्वसामान्य कुटुंबातील किंवा गरीब कुटुंबातील महिला आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही यासाठी आराखडा तयार करुन फिरत्या पथकाद्वारे महिलांची तपासणी करावी. शासन नागरिकांच्या आरोग्या संदर्भात संवेदनशील आहे. महिलांच्या दारापर्यंत पोहचून 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी करुन मोहिम यशस्वी करावी. तसेच मोहिमेत जिल्ह्यातील 18 वर्षावरील महिलांनी सहभागी होवून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.

यावेळी  जागतिक हृदय दिनाचे  औचित्य साधून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना  नवजीवन मिळाल्या बद्दल संबंधित मुलांच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त करत पालकमंत्री महोदय व उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना  गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले.

कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, महिला उपस्थित होत्या.
00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.