कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.30 :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या  कंत्राटदारांची  माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रादेशिक विभाग कोकण,नवी मुंबई या विभागातील तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व कामांची गुणवत्ता  राखण्यासाठी तसेच  विभागाला प्राप्त निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी खबरदारी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य मंजुरी आदेश देण्यात आल्या नंतरही काम सुरू न केलेले त्यासोबतच कार्यादेशात नमूद कालावधीत काम प्रगतीपथावर नसलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित यंत्रणांनी अशा कामांची आणि कंत्राटदार यांची माहिती सादर करावी. तसेच  स्थानिक रोजगार वृद्धीसाठी या ठिकाणी कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येईल, यादृष्टीने स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, संशोधन करून यंत्रणांनी नवकल्पना सूचवाव्यात असे सूचित मंत्री श्री.चव्हाण केले.

श्री.चव्हाण यांनी मंजूर कामांचा सविस्तर आढावा घेऊन कंत्राटदाराने विहीत कालावधीत दर्जेदार काम करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सर्तक रहावे. तसेच  पुल, रस्ता दुरुस्तीची कामे तत्परतेने करून जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. क्षेत्रीय अधिकारी यांनी स्थळपाहणी करून कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे.

आवश्यक तिथे स्थानिक यंत्रणांनी ग्रामीण भागात पूल बांधण्यासाठी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन,  जनजागृती करून गावात येण्या जाण्यासाठी पूलाची आवश्यकता पटवून देत  गावात असलेली जागा ग्रामसभेकडून उपलब्ध करून पूल बांधणी करावी. रायगड किल्ल्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कामांची पूर्तता वेळेत आणि दर्जात्मक करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी संबंधितांना दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतंर्गत  कल्याण निर्मल रस्ता राष्ट्रीय महामार्ग 61 च्या कामांचाही  मंत्री श्री. चव्हाण यांनी आढावा घेतला.

०००

वंदना थोरात/30.9.2022

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.