आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.१: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आणि नाट्यसंपदा प्रतिष्ठान निर्मित आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” या नाटकाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने दिनांक ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी ६.३०  वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” या नाटकाचा दि. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्ली येथील आयफेंक्स थिएटर मध्ये पहिला प्रयोग झाला होता. अनेक विक्रम, अनेक उच्चांक मोडत या नाटकाने तब्बल २८०० प्रयोगांची मजल मारली. प्रभाकर पणशीकरांच्या लखोबाने आणि त्यांच्या पंचरंगी भूमिकांनी उभ्या महाराष्ट्राला झपाटून टाकले. असे हे अजरामर इतिहास घडवणारे नाटक २०२२ वर्षात हीरक महोत्सवात पदार्पण करत आहे.

प्रबोधन आणि मनोरंजन असा दुहेरी परिणाम साधणाऱ्या “तो मी नव्हेच” ह्या नाटकाचे नाव घेतल्याशिवाय मराठी रंगभूमीचा आलेख पूर्णच होऊ शकत नाही. इतके हे नाटक मराठी रंगसृष्टीसाठी अविभाज्य आहे. आज लेखक आचार्य अत्रे, दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर व नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर या “तो मी नव्हेच” च्या शिल्पकारांपैकी कोणीही हयात नसले तरी त्यांच्या ह्या कलाकृतीला मानवंदना देणे हे सर्व मराठी रंगकर्मी व महाराष्ट्रातील रसिकांसाठी अगत्याचे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नाट्यसंपदा प्रतिष्ठान निर्मित शनिवार दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सांय. ६.३० वाजता एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मराठी रंगभूमीवरचे नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार असून “तो मी नव्हेच” नाटकातील महत्त्वाचे प्रवेश तसेच निवेदनाच्या माध्यमातून उलगडत जाणारा नाटकाचा रंजक इतिहास आणि मुख्य म्हणजे नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या काही दुर्मिळ चित्रफितींचा यात समावेश असेल. या कार्यक्रमाची संकल्पना नाट्यसंपदा प्रतिष्ठान संस्थेच्या जान्हवी सिंह आणि सौ. तरंगिणी खोत यांची आहे.  या कार्यक्रमाचे निवेदन आणि दृकश्राव्य सादरीकरण नरेंद्र बेडेकर करणार आहेत. लखोबाची प्रमुख भूमिका डॉ. गिरीश ओक हे करणार असून सौ. विशाखा सुभेदार श्री. सागर कारंडे, श्री. प्रभाकर मोरे, श्री. विघ्नेश जोशी, श्री. दिनेश कोडे, श्री.गोट्या (प्रभाकर) सावंत, पं. रघुनन्दन पणशीकर यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग आहे.

हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून प्रवेशिका कार्यक्रम स्थळी उपलब्ध असतील. या कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.  मुनगंटीवार यांनी केले आहे.

000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.