ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतिशील

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतिशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त आज कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते. व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक मधुकर पांडे उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.नार्वेकर म्हणाले, “शासन ज्येष्ठांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असून आर्थिक सहाय्यासोबतच भावनिक आधार देण्यासाठी सीएसआर मधला ठराविक निधी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वापरला जावा, यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगून महाराष्ट्र विधानसभेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील.”

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, “शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृतीशील असून नुकतीच राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास सवलत सुरू केली आहे. येत्या काळात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा, आपल्या पालकांचा योग्य सन्मान, काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य भावनेने कार्यतत्पर असून ज्येष्ठांना व्यापक आरोग्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.”

श्री. भांगे यांनी राज्य शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते पंच्याहत्तर, ऐंशी वर्षांवरिल ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीचा आणि लग्नाची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांच्या पुस्तकाचे तसेच सेवा पंधरवडा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा

नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास सवलत देण्यात आली आहे. याच पद्धतीने ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात एक सन्मानित, सुरक्षित, आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने त्यासोबतच इतर विविध योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणार्थ येत्या काळात विविध योजना राबविल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशात नमूद केले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.