आठवडा विशेष टीम―
सांगली, दि. 03, (जि. मा. का.) : पाण्यापासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील भागांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करु. जत तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, आवश्यक विकास कामे डीपीडीसी मधून निधी देऊन निश्चित पूर्ण करू अशी ग्वाही देऊन जत तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी सहाकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी केले.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जाडरबोबलाद येथे 2 कोटी 40 लाख 31 हजार 24 रुपये विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद माजी सभापती व जिल्हा नियोजन समिती सदस्य तम्मनगौडा रविपाटील, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता पी ए काटकर, शाखा अभियंता आर एन गावित, संग्राम जगताप, प्रमोद सावंत, सी बिरादार आदी उपस्थित होते.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जाडरबोबलाद पासून 13 किलोमीटर दूर असलेल्या उटगी तलावातून पाईपलाईन द्वारे पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी 1 एम एल डी क्षमतेचे जलशुद्धीकेंद्र बांधून त्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या जलशुद्धी केंद्रातून 2 लाख 48 हजार लिटर क्षमतेच्या बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडून जाडरबोबलाद येथील वाड्यावस्त्या व गावठाण मध्ये नळ पाणीपुरवठा द्वारे पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे दिली.
माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा परिषद माजी सभापती व जिल्हा नियोजन समिती सदस्य तम्मनगौडा रविपाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
000