प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोल्हापूर ही आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

श्री. केसरकर यांनी दसऱ्यानिमित्त कोल्हापूर तसेच राज्यातील सर्व रहिवाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थानच्या संस्थापक रणरागिणी ताराराणी, सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची परंपरा आणि करवीरनिवासिनी अंबाबाईच्या प्रति असलेली भक्ती यांचा संगम म्हणजे कोल्हापूरचा दसरा. राजघराण्यामार्फत साजरा केला जाणारा हा सोहळा शासनामार्फत दरवर्षी दिमाखात साजरा केला जाणार आहे.

कोल्हापूर संस्थानमार्फत छत्रपतींच्या परंपरा जपल्या जात आहेत. त्या यापुढेही जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. यावर्षी या दसरा महोत्सवासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार व्यक्त केले. पुढील वर्षीपासून अतिशय भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाईल. सातारा येथेसुद्धा अशीच परंपरा आहे. ही परंपरासुद्धा जगासमोर आणण्यासाठी छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत चर्चा करून नियोजन केले जाईल, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/4.10.2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button