प्रशासकीयब्रेकिंग न्युज

लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : राज्यात लोकसहभागातून  अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी  सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी केले.

अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी  प्रधान सचिव  आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, उपसचिव वि.रा. ठाकूर यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे 140 सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, अंगणवाडी दत्तक धोरणामुळे अंगणवाडीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ  होऊन सुदृढ बालक व मातांनाही चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल.अंगणवाडी दत्तक धोरणातील भौतिक सुविधांमध्ये इमारत बांधणी, दुरुस्ती, रंगरंगोटी, कुंपण, शौचालय, पाणीपुरवठा इ., शालेय शैक्षणिक सुविधांमध्ये देशी बनावटी खेळ साहित्य, खुर्ची, बसकरपट्टया, सतरंजी, रंगीत टी.व्ही. कृति पुस्तिका, बालकांची वजन व उंची मोजण्याची साधने, प्रशिक्षण व कौशल्याकरिता सहाय्य, आरोग्य तपासणी शिबिर, अंगणवाडी केंद्रांच्या व लाभार्थींच्या आवश्यकतेनुसार सहाय्य करणे. या बाबींसाठी सीएसआर मधून निधी देता येईल.

मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत अंगणवाडी केंद्रांद्वारे पूरक पोषण आहार,लसीकरण, आरोग्य तपासणी,अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण,आरोग्य व आहार शिक्षण या पाच सेवा देण्यात येतात.अंगणवाडी दत्तक धोरणामुळे यामध्ये वाढ होऊन सीएसआर मधून निधी  देणाऱ्यासंस्था तसेच सेवाभावी संस्थाना या क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके व तीने ते सहा वर्षातील सुदृढ बालक व निरोगी माता यांना त्याचा लाभ होणार असून राज्याची बालक व  मातांना यामुळे अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देता येतील.

००००

संध्या गरवारे/विसंअ/4.10.2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button