प्रशासकीयब्रेकिंग न्युज

लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करा

आठवडा विशेष टीम―

सोलापूर, दि.4  (आठवडा विशेष): राज्यामध्ये लम्पी आजाराने आतापर्यंत 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत श्री. विखे-पाटील बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे, विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर आदी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यात गाय वर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संशोधन करून मृत्यू नेमका होण्याचे कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सूचवावे. पशुधन मालकांची पशु ही संपत्ती आहे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.

टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाईन कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करावे. जनावरांची कोणती तपासणी करावी, निदान काय येईल, यावर कोणते उपचार करावेत, याविषयी कार्यशाळेत योग्य मार्गदर्शन करावे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घ्याव्यात

जिल्ह्यात लसीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असल्यास 15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घेता येतील. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असलेल्या विना चालक रूग्णवाहिका तीन महिन्यासाठी घ्याव्यात. या रूग्णवाहिका लसीकरणासाठी वापरता येतील. पशुधन जास्त असलेल्या तालुक्यात दोन रूग्णवाहिका वापरून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

श्री. प्रतापसिंह यांनी सांगितले की, राज्यात एक कोटी 40 लाख जनावरे असून एक कोटी 15 लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून एक कोटी 8 लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या 52 हजार पशु बाधित असून 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशींची समावेश नसल्याने म्हैशीची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावात लम्पी कमी होतोय. अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत.

टास्क फोर्सचे डॉ. बिकाणे यांनी सांगितले की, संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नाही. मृत्यू होणाऱ्यामध्ये वयस्क, आजारी जनावरे, गाभण असलेले, लहान वासरे यांचा समावेश आहे. यामुळे अशा जनावरांची पशुपालकांनी काळजी घ्यावी. अजून आठ ते 10 दिवस लम्पी आजाराचे रूग्ण निघतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

पशुपालकांना अर्थसहाय्य

लम्पी आजारामुळे जनावरे दगावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहा पशुपालक लाभार्थींना प्रातिनिधिक  स्वरूपात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मृत्यू पडलेल्या प्रत्येक संकरित गायीसाठी 30 हजार तर खिलार बैलासाठी पंचवीस हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button