लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ४ : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथिल करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

श्री. विखे पाटील यांनी सोलापूर येथून आयुक्त पशुसंवर्धन यांचे समवेत लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गठित राज्यस्तरीय कार्यदलाची (टास्क फोर्स) दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या जास्तीतजास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे.या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे होणारी मर्तुक कमी करण्यासाठी उपचार प्रोटोकॉल मध्ये सुधारणा करण्याचे आणि बाधित पशुरुग्णांचे सुक्ष्म अवलोकन करुन उपचार करण्याचे निर्देश श्री.विखे पाटील यांनी दिले.

शासन अधिसूचना दि. 30.09.2022 अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिलेली असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यामध्ये आज दि.4 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 179 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 52 हजार 955 बाधित पशुधनापैकी एकूण 27,403 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 115.11 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 108.29 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 77.39 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/4.10.2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.