आठवडा विशेष टीम―
त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांचे आश्वासन
चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोबर : निलजई व उकणी येथील शेतजमीनींच्या झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित संबंधीत शेतक-यांना देण्यात यावी. तसेच शेतातील पावसाचे पाणी काढण्याच्या दृष्टीने आवश्यक ड्रेन त्वरित तयार करण्यात यावी. येत्या दीड महिन्यात शेतातील पाणी काढण्यात आले नाही तर वेकोलीने संबंधीत शेतजमिनी संपादीत कराव्या, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
वनभवन, नागपूर येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वरिल विषयाच्या अनुषंगाने वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे सीएमडी मनोज कुमार, कार्मिक संचालक संजय कुमार, मुख्य महाप्रबंधक आभास सिंह यांच्यासह बैठक घेतली.
निलजई व उकणी या गावांमध्ये वेकोलीच्या चुकीच्या नियोजनामुळे २०१९ पासून पावसाचे पाणी शेतीजमीनीमध्ये जमा होवून शेताचे स्वरुप तलावाप्रमाणे झाल्याची तक्रार शेतक-यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने श्री. मुनगंटीवार यांनी वेकोलीच्या उच्चाधिका-यांसह बैठक घेवून चर्चा केली. २०१९ पासून शेत पाण्याखाली येत असल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई वेकोलीने द्यावी, शेतजमीन वेकोलीने अधिग्रहीत करावी, आदी मागण्या शेतक-यांनी या बैठकीत केल्या. या संदर्भात मंत्री मुनगंटीवार यांनी बैठकीत वेकोली प्रशासनाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले. या संदर्भात त्वरित मागण्या तपासून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन वेकोलीचे सीएमडी श्री. मनोज कुमार यांनी दिले. या बैठकीत विवेक बोढे, अमोल थेरे, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, बबलु सातपुते यांच्यासह संबंधीत शेतक-यांची उपस्थिती होती.
मुल येथील मालधक्का शहराबाहेर हलवावा
मुल शहरात होणारा मालधक्का हा सर्वांना मान्य असणा-या जागेवर, विशेषतः प्रदूषण न होणारी जागा निवडून त्याठिकाणी करण्यात यावा, याप्रकरणी लोकभावनेचा आदर करावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या उच्चाधिका-यांना दिले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरातील मालधक्का शहराबाहेर हलविण्याच्या नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या उच्चाधिका-यांसह वनभवन नागपूर येथे बैठक घेतली. या माल धक्क्यामुळे मुल शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात टोलेवाही-केळझर-भगवानपूर या रस्त्यालगतच्या जागेला भेट देत पाहणी करावी व जनतेला व नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागू नये, अशा पध्दतीची जागा मालधक्क्यासाठी निवडावी, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
दिनांक ७ किंवा ८ ऑक्टोबरला जागेची पाहणी करण्यात येईल व त्याअनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक श्री. सुर्यवंशी यांनी दिले. यावेळी वरिष्ठ विभागीय प्रबंधक श्री. गर्ग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत बोबाटे, अजय दुबे, नामदेव डाहूले आदी उपस्थित होते.
000000