आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 30 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष सोहळ्याचे विशेष आयोजन करून त्यांचे कार्य सर्व शाळा, महाविद्यालयांपर्यत पोहोचण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून त्यांच्या जीवन कार्यावर एका चांगल्या व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी. या चित्रपटासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येईल. मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. ‘हर घर संविधान’ अंतर्गत प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजे, अशाही सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000