प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार करण्यावर भर – मंत्री प्रकाश आबिटकर

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि.०३:  आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. भेटी दरम्यान त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आरोग्य भवन येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यातील विभागवार आरोग्य सेवांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना रुग्णालयातील स्वच्छता आवश्यक त्या चांगल्या आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला अधिकारी समवेत भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधेबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, रुग्णालयातील विविध विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता बाल आरोग्य सेवा, नवजात विशेष काळजी कक्ष, डायलिसीस सेंटर, अस्थिरोग विभाग तसेच विविध सेवा विभाग यांना भेट देऊन आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.

आरोग्यमंत्री श्री.अबिटकर यांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. महिला व पुरुष कक्ष, आहार कक्ष, पुनर्वसनात्मक सेवा विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयाच्यावतीने विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रादेशिक रुग्णालय बंगलोरच्या निम्हांस रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय साकारण्यात येणार असून याविषयी बांधकाम विभागाने सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

प्रादेशिक मनोरुग्णालय आदर्श कसे करता येईल याविषयी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुणे येथील मलेरिया, कुष्ठरोग, माता व बाल संगोपन, परिवहन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, आरोग्य प्रयोगशाळा, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, कुटुंब कल्याण, जलजन्य आजार, हत्तीरोग या विभागांच्या कार्याविषयी राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथेही झालेल्या बैठकीत विविध आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

बैठकीला संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर,  सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदि उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button