प्रशासकीयब्रेकिंग न्युज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

बारामती, दि.५: छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे १५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत शहरातील रेल्वे मैदानावर आयोजन करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी क्रीडामय वातावरणात स्पर्धा आयोजित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

क्रीडा विभागाच्यावतीने कबड्डी स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने सादरीकरणवेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता अमोल पवार, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव,

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य सतपाल गावडे, कबड्डी मार्गदर्शक दादा आव्हाड आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाकरीता राज्य राज्यशासनाच्यावतीने ७५ लाख रुपये अनुदान देण्यात येते. स्पर्धेच्या अनुषंगाने संपूर्ण बारामती परिसरात  कबड्डीमय वातावरण निर्माण झाले पाहिजे, याकरीता प्रत्येक बाबींचे  सूक्ष्म नियोजन करावे. सर्व संबंधित विभाग आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न करावेत. याकरीता निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे श्री. पवार म्हणाले.

या स्पर्धेत राज्यातून पुरुष व महिला प्रत्येकी १६ संघ दाखल होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणे गीत गायनाची व्यवस्था करावी.  रेल्वे मैदान परिसरासह शहरात वाहतूक कोंडी होणार नाही तसेच शहरात सुरळीत वाहतुकीच्या अनुषंगाने दिशादर्शक फलक लावावेत. मजबूत प्रेक्षकागृह उभारावे.

भोजन, अल्पोपहार उत्तम आणि ताजे राहील, या बाबत दक्षता घ्यावी. खेळाडूच्या आहारामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न, दूध, फळे आदी बाबीचा समावेश करण्यात यावा. बाहेरुन येणारे खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच तसेच प्रेक्षकांची गैरसोय होणार नाही, याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या.

श्री. कसगावडे म्हणाले की,  उप विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेकरीता विषयनिहाय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने सदस्यांची आढावा बैठक घेवून प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करुन कामे करण्यात येत आहेत. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असेही श्री. कसगावडे म्हणाले.

यावेळी भोजन, अल्पोपहार, पाणी, निवासव्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, प्रेक्षकागृह, शौचालय, विद्युत व्यवस्था, बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, मंच व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यात आली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button