प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पोलीस यंत्रणांनी दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा -उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

आठवडा विशेष टीम―

कोल्हापूर, दि. ६ जानेवारी २०२५ : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.

कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) रोजी बैठक पार पडली.

मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात केलेल्या कार्यवाही, सदर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाय योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत, जेष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने या बैठकीत आढावा घेण्यात आला.

या बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शौमिका महाडिक प्रत्यक्ष तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अक्षीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर,सांगली,सातारा पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबर घडलेल्या गुन्ह्यांच्या मूळ कारणांपर्यत जाण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना देवून उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “पॉक्सोअंतर्गत लहान मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात गुन्ह्याचा तपास करताना पिडीतेची ओळख गुप्त राहील, तसेच पिडीतांनी व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करावे. ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात कार्यवाही करावी. चर्चासत्रांचे आयोजन करावे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती फलकांवर लावण्यात यावी, असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

तसेच डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लहान मुलींवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी शाळामध्ये “गुड टच बॅड टच ”  या संदर्भात प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षीत मुलींचे गट तयार करुन या संदर्भांत जनजागृती करावी. “अत्याचारग्रस्त पीडितांची वैद्यकीय तपासणी अथवा उपचार करताना योग्य दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्याबाबत कार्यवाही करावी. साक्षीदार संरक्षण कायद्याचे तंतोतंत पालन करुन त्यांची योग्य अंमलबजवाणी करावी. पिडीतांना  कोर्टात घेवून जातानाही याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. चार्ज शिट दाखल करताना कायद्याचे पालन करावे. दंड संहितेनुसार बी समरीचे पुर्नरिक्षण करणाच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी दिल्या.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी तपास यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आदेश देवून कायद्यासंदर्भातील सर्वसाधारण सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीव्हीचे प्रमाण वाढविण्यात यावे असे निदेश देवून महिला अत्याचार तपास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत सूचीत केले.

उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळी परिक्षेत्रातील जिल्हानिहाय कामकाज व गुन्हांच्या तपाससंदर्भांत आढावा यावेळी घेतला.बैठकीला महिला कक्षामध्ये कार्यरत असणारे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button