प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर कराव्यात – मंत्री अतुल सावे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ७ : इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह मिळण्याबाबत तसेच येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करून या कामाला प्राधान्य द्यावे, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होत नसेल, तर संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि  जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून यावर तातडीने मार्ग काढावा. विभागांतर्गत सुरू करण्यात येणारी वसतिगृह ही सर्व सोयीसुविधा युक्त असावीत. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे काम हे लोकांशी संबंधित योजनांशी आहे. त्यामुळे या  विभागाच्या योजना या ऑनलाईन कराव्यात. विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून घ्याव्यात.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या आयजीटीआर या  प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)  या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगासाठीच्या तांत्रिक  प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) करीत आहे. महाज्योती संस्थेच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा नुकताच नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, आश्रमशाळांच्या संच मान्यता, बंद पडलेल्या आश्रमशाळांचा आढावा, धनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजना, मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा  आढावा, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना, याबाबतचा आढावाही मंत्री श्री. सावे यांनी या बैठकीत घेतला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तसेच महाज्योती, अमृत या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button