प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आदिवासी तरुण योहान गावित यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान

आठवडा विशेष टीम―

नंदुरबार, दि. १७ जानेवारी २०२५ (आठवडा विशेष) : नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या शेतकरी योहान अरविंद गावित यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत भारताच्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२५) त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

गावातून दिल्लीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शासनाकडून ६०% अनुदान मिळवले. या योजनेतून त्यांना १८ पिंजरे उभारण्यासाठी सुमारे ३२.४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. योहान गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालन सुरू केले.

मत्स्य व्यवसायातील आधुनिकता आणि सामाजिक दृष्टीकोन

योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवले. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवले. याशिवाय, मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यवसायिक गरजा भागवल्या. आज त्यांच्या या कामामुळे भवरे गाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र शासन स्तरावरही झाली. महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचे यश अधोरेखित केले. यानुसार, केंद्र शासनाने त्यांची निवड करून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित केले आहे. नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीही या  प्रकल्पाला भेट देवून योहान गावित यांचे कौतुक केले होते.

आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण

भारतीय पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमॅन सुनिल गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण योहान गावित यांना सुपुर्द केले. हे आमंत्रण स्वीकारताना योहान गावित आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. “हे आमच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो, हे आम्ही सिद्ध केले,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

तरुणांसाठी प्रेरणा

योहान गावित यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत जलसाठा असलेल्या इतर गावांतील तरुणही मत्स्यपालनाकडे वळत आहेत. भवरे गावातून सुरू झालेली ही प्रेरणा आता जिल्हा, राज्याची सिमा ओलांडून देशातील इतर भागांपर्यंत पोहोचली आहे.

अधुनिक शेतीचा आदर्श नमुना

योहान गावित यांच्या कामगिरीमुळे शेतीसोबत जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करता येतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यांच्या कार्यामुळे भवरे गावाचे नाव देशपातळीवर पोहोचले असून त्यांची ही कामगिरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सन्मान समारंभात नवा इतिहास घडवणाऱ्या योहान गावित यांचे यश ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button