प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महिला बचत गट उत्पादीत माल विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार – मंत्री जयकुमार गोरे

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि. १७: खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तूंची निर्मिती करत असलेल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील. या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हा परिषद मैदानावर ‘मिनी सरस २०२५ मानिनी जत्रे’चे उद्घाटन व ‘महा आवास अभियान २०२४-२५’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद आदी उपस्थित होते.

‘उमेद’ अंतर्गत महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम ठरविला आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 50 लाख महिलांना लखपती दिदी करणार आहे. महिला बचत गट आता खाद्यपदार्थांबरोबर इतर चांगल्या वस्तूंची निर्मिती करीत आहे, त्यांच्या वस्तूंसाठी विविध शहरांमधील मॉलमध्ये एक स्टॉल उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सातारा जिल्ह्यात 20 हजार महिला बचत गट आहेत.  उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवी चळवळ उभी राहत आहे.

बचत गटाच्या महिला घेतलेले कर्ज नियमित फेडत असतात, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाडून जिल्ह्यातील या महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. नायगाव येथे 125 कोटी रुपये खर्च करुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात येत आहे. येथे उमेदचे प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून मॉल उभारण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले की, बचत गटांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळावी, म्हणून केंद्र व राज्य शासन काम करीत आहे. छोट्या छोट्या व्यवसायांना वित्त पुरवठा करुन केंद्र व राज्य शासन या व्यवसायिकांना व्यवसायासाठी बळ देत आहे. बचत गट चांगल्या उत्पादनांची निर्मिती करीत आहेत. या उत्पादकांनी आपला संपर्क क्रमांक सर्वांना द्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादीत मालाची विक्री व्हावी यासाठी महामार्गावर मॉलची निर्मिती करावी. यातून त्यांचा माल चांगल्या दरासह मोठ्या प्रमाणात विकला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रामच्या प्रारंभी मंत्री श्री. गोरे यांनी महिला बचत गटांच्या प्रत्येक स्टॉला भेटी देवून उत्पादीत मालाची माहिती घेतली.

यावेळी लखपती दिदींचा सत्कार, 2024-2025 अंतर्गत आवास योजेंतर्गत पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात घराचा ताबा व उमेद अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button