पुढील २५ वर्षांचे व्हिजन ठेवून सप्तश्रृंगी गडाचा विकास आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादाजी भुसे

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नाशिक : दि. (जिमाका वृत्त) : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि शक्तीपीठ म्हणून जनमानसात श्रद्धेचे प्रमुख स्थान असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी गडावर येत असतात. त्यामुळे येणाऱ्या २५ वर्षांचे व्हिजन समोर ठेवून विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सप्तश्रृंगी गडाच्या विकास आराखड्यासंदर्भातील बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, सप्तश्रृंगी गडाच्या ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन दहातोंडे, वणी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, गडावरील पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत स्वतंत्र प्रस्ताव सादर करून निधी मागणी करण्यात यावी. तसेच भाविकांच्या सोयीसाठी डोम उभारणे, शौचालय बांधणे, रस्त्यांची निर्मिती यासह भवानी पाझर तलाव जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरूस्ती करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच १०८ कुंडातील विविध कुंडांचे वनविभागाच्या समन्वयातून दुरूस्तीचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसात सादर करावेत, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिले आहेत.

गडांवरील पथदिव्यांचा आढावा घेऊन पादचारी मार्गिकेच्याही पथदिव्यांसह संपूर्ण पादचारी मार्गिका दुरूस्तीचीही कामे हाती घेण्यात यावेत. वनविभागाने प्रदक्षिणा मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी करावी. यात्रेच्या दिवसांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात दोन वाहनतळे निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. त्यासाठी संबंधित विभागांनी स्थानिक

नागरिकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी. गडावर स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या प्रस्तावासाठी शासनस्तरावर  पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून ते पुढे म्हणाले, वनविभागाच्या जागेवर उद्यान निर्मितीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्रपणे सादर करावा.

गावांच्या बाहेरील खाजगी जागेवर तेथील लोकांमार्फत पर्यटकांना सुविधा देण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे नियोजन करावे.  त्यातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. मंदिराच्या खालील भाग हा मातीचा असल्याने तेथे भुस्खलनातून दुर्घटना घडणार नाही यासाठीचे पूर्वनियोजन करण्याबरोबरच गडावर जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या गाड्या सुस्थितीत असल्याचीही खात्री करून घेण्यात यावी, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

नरेगाच्या 803 कामांचे उद्घाटन

या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विशेष मोहिमे अंतर्गत 803 कामांचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. ही कामे दर्जेदारपणे पूर्ण करण्यात यावीत. तसेच या कामांच्या माध्यमातून साधारण 3 लाख 16 हजार मनुष्य दिन निर्मिती होणार  असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

00000000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.