प्रशासकीयब्रेकिंग न्युज

माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 21 : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनी, निर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसा, परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवर, सोशल मीडियावर काही सेकंदांत बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर ‘एआय’चा मोठा प्रभाव पडणार आहे. ‘एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता, आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, एखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चुकीच्या गोष्टीवर टीका करणे, टीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही श्री. पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः सकारात्मक आहोत. माध्यमकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. मंत्रालय वार्ताहर संघाकडून, मंत्रालयात दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रकाशमान करणारा ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.चोरमारे आजच्या माध्यम क्षेत्राविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेपुढे मोठे आव्हाने निर्माण झाली आहेत. गंभीरपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यास मध्यवर्ती पत्रकारितेमध्ये स्थान राहिले नाही. मात्र, तरीही गंभीरपणे व प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार स्वतःची जागा निर्माण करत आहेत. पत्रकारांना समाजातील समस्या जाणून घेऊन त्याचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम संस्थांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे काम केले आहे. मात्र, माध्यमांनी याची अधिक दखल घेणे गरजेचे होते असे श्री. चोरमारे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी शासनाने पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवावे, अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिताली तापसे यांनी केले तर आभार श्री. यादव यांनी मानले. निवड समिती सदस्य सर्वश्री अभय देशपांडे, मंदार पारकर, खंडूराज गायकवाड, सुरेंद्र गांगण, संजय बापट व भगवान परब यांचा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन 2023) आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी (सन 2024)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2023 :

मुद्रित माध्यम – ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्य, लोकसत्ता

वृत्तवाहिनी – पत्रकार विनया देशपांडे, सीएनएन आयबीएन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य – ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे, लोकमत, मुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2024 :

मुद्रित माध्यम – ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटील, लोकमत, सातारा

वृत्त वाहिनी – मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलार, पुढारी, मुंबई

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button