आठवडा विशेष टीम―
पुणे, दि. २९: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
समाज कल्याण आयुक्तालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांचा आढावा घेऊन मंत्री शिरसाट म्हणाले, अंमलबजावणी यंत्रणेने योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींची माहिती सादर करावी, जेणेकरून त्यावर उपाययोजना करता येतील. जिल्हास्तरावर अनुसूचित जाती उपयोजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी विविध विभागांशी योग्य समन्वय ठेवण्यात यावा. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी आवश्यक त्या शासन निर्णयांमध्ये बदल करण्यात येईल.
सामाजिक न्याय मंत्री पुढे म्हणाले, राज्यामध्ये २५ हजार विद्यार्थ्यांसाठी नव्याने वसतिगृहे सुरु करण्याचा मानस आहे. बैठकीनंतर मंत्री श्री. शिरसाट यांनी सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथील युनिट क्र. ३ व ४ च्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी करुन सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करणेबाबत आदेश दिले. तसेच हे वसतिगृह सुरु करणेसाठी वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करणेबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
यावेळी समाज कल्याण विभागातील कर्मचारी आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
0000