विश्वकोश कार्यालयासाठी वाईत आद्ययावत इमारत उभारणार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि. २२ : वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी नव्याने आद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाच्या इमारतीसाठी जागेची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठी विश्वकोशाचे सहसचिव शामकांत देवरे, पुरुषोत्तम जाधव, विकास शिंदे, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सुरु केलेले येथील विश्वकोश निर्मितीचे कार्य हा मराठी भाषेचा ठेवा आहे. तो जिवंत ठेवण्यासाठी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक म्हणून विश्वकोशाची नवी इमारत ही अद्ययावत परिपूर्ण असेल. यामध्ये कार्यालय, अभ्यासिका, ग्रंथालय, अँफी थिएटर,अभ्यासिका अशा सुविधा दीड एकर जागेत उपलब्ध केल्या जातील. या इमारतीसाठी एका संस्थेची व एका खाजगी जागेची पाहणी करण्यात आली आहे.

विश्वकोश हा मराठी भाषेचा मानबिंदू आहे. ज्यावेळी येथे विश्वकोशाची अद्ययावत इमारत पूर्ण होईल त्याचवेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे स्वप्न पूर्ण होईल. शासन मराठी भाषेचा आणि विश्वकोशाचा प्रचार आणि प्रसार जगभर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नुकतेच मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

केंद्र सरकारकडून नव्याने शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात येणार आहे. इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करण्याचे सामर्थ्य फक्त विश्वकोशात आहे. यामुळे पुढील काही महिन्यात हे मार्गी लावण्यात येईल. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अनेक प्रगल्भ शिक्षक असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावा, यासाठी शैक्षणिक स्तरावर एक मासिक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील शाळांमधून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प राज्यातील शिक्षक व अभ्यासकांना उपलब्ध होतील. राज्यातील शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या समस्या समजून घेत आहोत. जेणेकरून राज्यातील शैक्षणिक धोरणाला  चांगला आकार देता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.