मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २३ : “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार समाधान अवताडे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, ज्येष्ठ साहित्यिक उषा तांबे उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेतील योगदानाबद्दल मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तर, रामकृष्ण प्रकाशनाच्या ‘ग्राहक दृष्टी- राष्ट्र पुरुष जागा होतोय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे सहयोगी संपादक – संचालक अविनाश पात्रीकर आहेत.

दीपक केसरकर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1

मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, “मराठी भाषा विश्वकोष तयार करणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या जन्मगावी वाईला मराठी भाषेचा गौरवपूर्ण इतिहास जतन करणारे ‘संग्रहालय’ उभे राहणार आहे. मरीन लाईन्स, मुंबई येथे मराठी भाषा भवन ची इमारत उभी राहते आहे. या भवनात मराठी भाषा अभ्यासकांसाठी अभ्यासिका आणि मुंबई बाहेरील साहित्यिकांना निवासाची व्यवस्था असणार आहे. नुकत्याच झालेल्या मराठी विश्व संमेलनाचा संदर्भ देऊन श्री. केसरकर यांनी दरवर्षी असे संमेलन घेणार असल्याचा मानस बोलून दाखविला.

मराठी साहित्य संमेलन घेणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा अनुदान निधी वाढविला असून सीमाभागात मराठी भाषा संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. ज्ञान भाषा म्हणून मराठीचा वापर वाढावा यासाठी शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्यात येणार आहेत. यामुळे मराठी शाळा संवर्धनाला मदत होईल असेही मंत्री श्री. केसरकर म्हणाले.

मराठी भाषेच्या योगदानासाठी माहिती संचालक हेमराज बागुल सन्मानित

मराठी भाषेसाठी विविध प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील पाच अधिकारी व कर्मचारी यांचा मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, मुख्यमंत्री सचिवालय येथील अवर सचिव सुधीर पंडितराव शास्त्री, जलसंपदा विभागाच्या सहायक कक्ष अधिकारी श्रीमती सारिका चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे उच्च श्रेणी लघुलेखक जगदीश कुळकर्णी, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती खदीजा नाईकवाडे यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ जानेवारी ते दि. २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. यादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

०००

अर्चना शंभरकर/विसंअ

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.