जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत १०० टक्के सातबाराचे वाटप – पालकमंत्री दीपक केसरकर

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

कोल्हापूर, दि. 26, (जिमाका):- जिल्ह्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. जिल्ह्यात 13 लाख 84 हजार 801 शेती खातेदारांची संख्या असून 9 लाख 52 हजार 460 इतकी 7/12 ची संख्या आहे. जिल्ह्यातील सर्व खातेदारांना घरपोच 7/12 वितरण मोहिमेअंतर्गत एप्रिल 2022 अखेर 100 टक्के वाटप पूर्ण झाले आहे. 7/12 संगणकीकरणाचे काम अचूकरित्या व गुणवत्तापूर्ण झाल्याने भविष्यातील असंख्य तक्रारी, महसुली, दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे दावे कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त शाहू स्टेडियम मध्ये आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर मार्गदर्शन करत होते.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे,  विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी पत्रकार व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

kop1

पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांची महापूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला तत्काळ 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. तर संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नवीन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी विशेष बाब म्हणून 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नागरिकांना चांगले व उत्कृष्ट रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले.

अमृत-2 योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरामध्ये दुस-या टप्यात 344 कोटीचा प्रस्ताव ड्रेनेज लाईन, रंकाळा आणि लक्षतीर्थ तलाव पुनर्जिवीत व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळून कामांना सुरुवात होणार आहे.  कोल्हापूर शहरात दिव्यांग नागरिकांसाठी “राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान” राबविण्यात आले. यावर्षी महापालिकेने दिव्यांगासाठी साडेसहा कोटीचा निधी राखीव ठेवला आहे, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. तसेच महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयाच्या कुमारी अंजली बाबासो पाटील या विद्यार्थींनीने शासकीय शिष्यवृत्ती योजनेत राज्यात चौथा क्रमांक मिळवून शासकीय शाळा ह्या खासगी शाळेच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात कोठेही कमी नसल्याचे दिसून येते, ही बाब अत्यंत समाधानकारक आहे, असे त्यांनी म्हटले.

जिल्ह्यात आलेले दोन महापूर तसेच कोविड विषाणू संसर्गाच्या तीन लाटेमध्ये तसेच सीमावादाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नावेळी कोल्हापूर पोलीस दलाने बंदोबस्ताचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे.  जिल्ह्यात विपुल नैसर्गिक वनसंपदा लाभली असल्याने वन विभागाकडून निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. कोविड लसीकरणांमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रगतीपथावर असून पहिला डोस 94 टक्के तर दुसरा डोस 80 टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. तर बूस्टर डोस ही जवळपास दोन लाखापेक्षा अधिक नागरिकांनी घेतला आहे. कोविडच्या दोन्हीही लसी आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असून  नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 अंतर्गत 425 कोटी इतकी तरतूद मंजूर आहे. यापैकी आतापर्यंत शासनाकडून 258 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. तर अनुसूचित जाती उपायोजनासाठी 116 कोटी 60 लाखाचा निधी मंजूर असून या अंतर्गत विविध लोकोपयोगी विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच शासनाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले असून या विभागाचे काम लवकरच सुरू होऊन राज्यातील सर्व दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

प्राथमिक शिक्षण विभागांतंर्गत 2021-22 या वर्षांत झालेल्या पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे म्हणून “फ्युचरस्टिक क्लासरुम” ही संकल्पना राबवली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत करवीर तालुक्यातील यादववाडी येथील शाळेला 32 लाखाचे अनुदान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी  शासन प्रयत्नशील आहे, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात गोवर रुबेलाचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेने लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवली आहे.  जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण व निर्मुलनासाठी पशुसंवर्धन विभागास जिल्हा नियोजन समितीकडुन अतिरीक्त 3 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 1 हजार 264 योजनांसाठी 1 हजार 64 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत 6 लाख 78 हजार कुटुंबापैकी 5 लाख 58 हजार  कुटुंबाना नळाद्वारे शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात पाच वर्षात 12 हजार 500 घरकुले मंजूर झाली असून यापैकी 11 हजार 265 घरकले पूर्ण असून 90 टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. . तर राज्य पुरकृत सर्व आवास योजने मध्येही विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिल्ह्याला मिळालेला आहे, अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या जिल्ह‌्यातील 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान म्हणून एकूण 441 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. बदलत्या पीक पद्धतीत रेशीम शेती हा चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर असून  जिल्ह्यात रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्याचे आवाहन केले.

शासकीय व खासगी ठिकाणी कार्यरत आहेत. यातील 43 कार्यालये भाडेतत्वावरील इमारतीत कार्यरत आहेत. शेंडा पार्क येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून लवकरच या जागेत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी इमारत बांधकाम सुरु करण्यात येणार असून या कामासाठी 1 हजार 43 कोटींचा निधी मंजूर आहे. जागतिक स्तरावर वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला असून हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपला देश व राज्य विविध उपाययोजना करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील कणेरी मठ संस्थान (पंचमहाभूत लोकोत्सव) 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राबवत असून यातून जिल्हा, राज्य, देश व जागतिक स्तरावर  पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. या महोत्सवात किमान 30 ते 40 लाख नागरिक येण्याची अपेक्षा असून या सर्व नागरिकांना पर्यावरण संवर्धना बाबत प्रबोधित केले जाणार आहे. या ठिकाणी शासनाच्या वतीनेही पर्यावरण संवर्धना बरोबरच विविध शासकीय योजनांची माहितीही दिली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनात कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर ठरेल यासाठी या महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर परेड कमांडर पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्यासमवेत श्री. केसरकर यांनी परेड चे निरीक्षण केले. त्यानंतर पथ संचलन झाले.

यावेळी पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, समाज कल्याण कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री श्री. केसरकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक, पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्हयाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया असे आव्हानही त्यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाचा शेवट झाला.

                     ****

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.