प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. ०२ : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहेत. स्थानिक खेळाडुंना सरावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छोट्या मैदानांचा विकास करण्यात येईल व यासाठी  महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५० कोटींचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू शितल देवी, क्रिकेटपटू मोहित शर्मा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील खेळाडुंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ५८ क्रीडा प्रकारात विजेत्यांना १२ हजारांवर पदके प्रदान करण्यात आली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा महोत्सवातून विदर्भातील गुणवान कलाकार व खेळाडू पुढे येत आहेत. यातून विदर्भ व नागपूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारे कलाकार व खेळाडू घडतील. शहरात ऑलिम्पीकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ७०० कोटींच्या निधीतून मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाचे कार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, गत सात वर्षांपासून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा व्यक्तीमत्व विकास साधणे व नेतृत्वही घडवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहरातील क्रीडा मैदानाच्या विकासासाठी यापूर्वी १०० कोटींचा निधी दिला आहे. अजूनही छोट्या मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते खेळाडू, प्रशिक्षक आदींना उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडा महर्षी, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शितल देवी आणि मोहित शर्मा यांनीही यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन केले. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. १२ जानेवारी २०२५ पासून यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. २१ दिवस चाललेल्या महोत्सवात ५८ क्रीडा प्रकारात ७७ हजार ६६३ स्पर्धक सहभागी झाले. नागपुरातील ६९ मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण दीड कोटींची बक्षीस तर १२ हजार ३१७ पदके प्रदान करण्यात आले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button