प्रशासकीयब्रेकिंग न्युज

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. 3 : आज जैन धर्म पश्चिम आणि उत्तर भारतात दिसत असला तरी एकेकाळी तामिळनाडू राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तामिळ भाषेत जैन साहित्य देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तीर्थकर भगवान महावीर यांचे जीवनकार्य सर्वकाळ प्रेरणादायी असून भगवान महावीर यांच्या जीवनावर राज्यातील शाळाशाळांमधून निबंध स्पर्धा आयोजित केल्यामुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणाक महोत्सव समितीतर्फे राज्यातील शाळांमध्ये आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. २) राजभवन, मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

भगवान महावीरांचे जीवन त्यागमय होते असे सांगताना केवळ स्वतःसाठी जगणे पाप असून इतरांसाठी जगल्यास ईश्वर आपली काळजी वाहिल, असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

या स्पर्धेत राज्यातील शाळांमधील १.२ कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही अतिशय उत्साहवर्धक बाब असल्याचे सांगून मुलांनी लिखाण तसेच वाचनाची सवय ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मुलांनी मोबाईल फोनवर आपला वेळ वाया न घालवता वेळेचे नियोजन करून मोबाईलचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुलांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राजभवन येथे होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अहिंसा परमो धर्म हा भगवान महावीरांचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी स्पर्धा उपयुक्त असल्याचे आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. स्पर्धेमुळे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भगवान महावीरांच्या जीवनाचे अध्ययन केले असे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. यावेळी भगवान महावीरनिर्वाण कल्याणक महोत्सव समितीचे निमंत्रक हितेंद्र मोटा उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते स्पर्धेतील  विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विजेत्यांना बक्षीस रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात सहकार्य केल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांचा देखील सत्कार करण्यात आला.

000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button