प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवा – मंत्री दादाजी भुसे

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दि. ०३ (जिमाका): आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय शिक्षणासोबतच व्यवहारीक ज्ञान व विविध कौशल्ये अवगत असली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवावेत, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलेत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री ई- उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे, शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ई-उपस्थित तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक),शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण योजनेचे प्राचार्य व आदर्श शिक्षक हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, सर्व विभागातील शाळांचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. यासोबत मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह असावीत. शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ही शहरात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांना देण्यात येणार आहे. मुलांना शाळेत देण्यात येणारा आहाराचा दर्जा उत्तम असावा. सर्व माध्यमाच्या शाळांनी राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायले गेले पाहिजे. यासोबतच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिर्वाय आहे व तो शिकविला गेला पाहिजे याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी. मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ज्या शाळांना संरक्षक भिंत नाही त्यांनी नरेगाच्या माध्यमातून करून घ्यावी. शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळांना भेटी द्याव्यात व भेटीद्वारे शाळांची गुणवत्ता तपासणीसोबतच त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबी व अडचणी दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात इतर विभागांचे अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. त्यादृष्टीन विभागातील सर्व शाळांनी मुलांचे अध्ययन व  शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करावेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये स्थलांतरामुळे अडचणी निर्माण होतात. या कामागारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये व त्यांचे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. विभागात आगामी काळात होणाऱ्या परिक्षांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवाविण्यासाठी  सर्व शाळांनी आवश्यक तयारी करावी. शाळांमध्ये आवश्यक सेवासुविधा व भौतिक विकासासाठी  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता होवू शकते. यासह लोकसहभाग, जिल्हा परिषद सेस निधी , क्रिडा विभाग, सेवाभावी संस्था, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, जिल्हा पातळीवरील मोठे उद्योग यांच्या सीएसआर निधीतून ही कामे करणेही शक्य असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात तालुका पातळीवर एक आदर्श शाळा तयार करायची आहे. या शाळांमध्ये वाचनालय, लॅब, क्रिडा साहित्य, डिजिटल सुविधा असणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनधींशी आवश्यक बाबींची चर्चा करून तसा आराखडा तयार करावा. 200 पटसंख्या वरील शाळांमध्ये एक स्मार्ट क्लासरूम तयार करणार असून त्या स्मार्ट क्लासरूम मध्ये सर्व प्रकारच्या अद्ययावत व डिजीटल शिक्षणाच्या सुविधा असतील. आढवड्यातील प्रत्येक दिवस इयत्तेनुसार या क्लासरूमचा अनुभव घेता येईल.  शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याऱ्या शिक्षकांच्या कामाची दखल घेण्यात यावी. सर्व अधिकारी व शिक्षकांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशाही सूचना शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

आज विभागातील ‍नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांचा आढावा शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी घेतला. यावेळी सर्व विभागातील प्रमुखांनी सादरीकरणातून माहिती सादर केली. विभागतील आदर्श शिक्षकांनी त्यांनी केलेल्या उपक्रमांची माहिती व मनोगत व्यक्त केले. जिल्हा परीषद शाळा बोदवड, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव शाळेतील शिक्षक सुनिल बडगुजर लिखित बालकांचे भावविश्व या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राजमोही लहान शाळेतील विद्यार्थांशी शालेय शिक्षण मंत्री यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. सुरवातीला गुरूगोविंदसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलविरसिंग छाब्रा यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे स्वागत केले.

 

०००

                        

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button