आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ०४ : राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात अहिल्यानगर पाणीपुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सदानंद दाते, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अहिल्यानगरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता राम लोलपोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी सुरू असलेल्या योजना गतीने पूर्ण कराव्यात. समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठा योजनेतील कामांची तपासणी करण्यात यावी. जे ठेकेदार किंवा अधिकारी कामामध्ये विलंब करतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.
पाणीपुरवठा योजना ही ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करणे, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/