प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

आठवडा विशेष टीम―

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

मुंबई, दि. ७ : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.

मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये १० लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार- मानपत्र, सन्माचिन्ह व रूपये ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार- मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये २ लाख असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठी भाषा मंत्री सामंत यांनी बीकेसी येथे पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात या पार्श्वभूमीवर यंदापासून हे पुरस्कार गेट वे ऑफ इंडिया समोर दिमाखदार सोहळ्यात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी नामवंत साहित्यिकांची समिती नेमण्यात असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाङमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नसल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नसल्याची माहीती यावेळी देण्यात आली. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना घोषित करण्यात आला आहे. या प्रौढ वाङमय प्रकारातील प्रत्येक पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नसल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला असल्याचे मराठी मंत्र्यांनी घोषित केले. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.

या दिमाखदार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचबरोबर २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाचे ‘कवितांचे गाव’ म्हणून उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले.

त्याचबरोबर रत्नागिरी येथील कवि केशवसूत यांच्या मालगुंड यास ‘पुस्तकाचे गाव’ करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे मराठी भाषा मंत्र्यांनी जाहीर केले. कवितांचे गाव या संकल्पेनुसार शिरवाड गावातील ३५ घरांमध्ये वाचनालय निर्माण करून तेथे कवितांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे आणि ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पेत गावातील ३५ घरांमध्ये प्रत्येक एक हजार नवी कोरी पुस्तके ही लहान मुले, युवक आणि प्रौढांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button