प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अभिजात मराठी भाषा : ऐतिहासिक वारसा आणि शास्त्रशुद्ध अधिष्ठान

आठवडा विशेष टीम―

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

नवी दिल्लीत होत असलेले ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटनही याला अधिक महत्त्व प्राप्त करून देईल. अशा या विशेष संमेलनानिमित्त ‘मराठी भाषा ते अभिजात मराठी भाषा’ या प्रवासाचा आढावा घेणारे संकलन…

मराठी भाषेचा उगम : ऐतिहासिक ठसा

मराठी भाषेचा उगम केवळ श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वरच्या शिलालेखात सापडत नाही, तर तिची मुळे अधिक खोल आणि प्राचीन आहेत. लिखित पुराव्यांचा शोध घेतल्यास, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा पहिला लिखित ग्रंथ ‘गाथा सप्तशती’ आढळतो. सातवाहन राजा हाल याने गोदावरी खोऱ्यातील कविंच्या रचनांचे संकलन करून हा ग्रंथ संपादित केला. यातील भाषा महाराष्ट्री प्राकृत होती, जी मराठीच्या उगमस्थानी आहे.

परंतु, यापूर्वीही महाराष्ट्री प्राकृत अस्तित्वात होती का? याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. याचा ठोस पुरावा इ.स.पूर्व ३०० मध्ये वररुची (कात्यायन) यांनी लिहिलेल्या ‘प्राकृत प्रकाश’ या ग्रंथात सापडतो. हा ग्रंथ प्राकृत भाषेचे व्याकरण स्पष्ट करणारा असून, त्यात महाराष्ट्री प्राकृतसह मागधी, अर्धमागधी, पैशाची आणि पाली भाषेचाही समावेश आहे. त्यामुळे मराठी भाषेचा उगम किमान २३०० वर्षांपूर्वीचा असल्याचे निश्चित होते.

ज्ञानेश्वरी ते आधुनिक मराठी : भाषा परिपक्वतेचा प्रवास

कोणतीही भाषा पूर्णतः व्याकरणबद्ध स्वरूपात यायला काही शतकांचा काळ लागतो. १२व्या शतकातील ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्री प्राकृतची परिष्कृत आवृत्ती म्हणता येईल. ज्ञानेश्वरांचे समकालीन संत नामदेव, मुकुंदराज, म्हाइंभट आणि त्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या साहित्यातून मराठी अधिक स्थिरावत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’ तयार करून राजव्यवहारासाठी मराठीला सशक्त केले. धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांनी हा कोश लिहिला होता. पुढे १८व्या शतकात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी १८३६ मध्ये ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला.

अभिजात भाषेचे निकष आणि मराठी

भारत सरकार कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देताना पुढील महत्त्वाचे निकष विचारात घेते, त्यात

  1. प्राचीनतेचा पुरावा: भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांपर्यंत मागे जाणारा असावा.
  2. स्वतंत्र व्याकरण आणि लेखन परंपरा: भाषा केवळ बोली स्वरूपात नसून शास्त्रशुद्ध व्याकरण आणि साहित्यपरंपरा असावी.
  3. मौलिक साहित्य ठेवा: ज्ञानपरंपरा असलेले ग्रंथ आणि साहित्य शतकानुशतके उपलब्ध असावे.
  4. सतत वापर आणि टिकाऊपणा: भाषा अद्यापही लोकांमध्ये व्यापक प्रमाणावर वापरली जात असावी.

मराठी भाषा या सर्व निकषांमध्ये योग्य ठरली.म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.

सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने नाणेघाटात कोरलेला शिलालेख आणि महाराष्ट्रातील लेण्यांमधील अनेक शिलालेख हे आद्य भाषेचे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे आहेत.

मराठीला अभिजात दर्जा : ऐतिहासिक निर्णय

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. आनंद उबाळे, परशुराम पाटील, डॉ. मैत्रेयी देशपांडे आणि अन्य विद्वानांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यात आला.

हा सन्मान मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे मराठीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, शैक्षणिक अनुदान आणि जागतिक स्तरावर तिची प्रतिष्ठा वाढणार आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक संमेलन आणि पुढील वाटचाल

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने हे संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे.

यामुळे मराठी भाषा संशोधनासाठी अधिक अनुदान आणि केंद्रे स्थापन केली जातील. मराठीचा शैक्षणिक स्तरावर अधिक व्यापक वापर होईल.डिजिटल माध्यमांत मराठीला अधिक संधी निर्माण होतील.

अभिजात मराठीचा अभिमान

मराठी भाषेत एकूण ४२ बोलीभाषा असल्याचे भारतीय विद्वान मानतात. यामध्ये अहिराणी, वऱ्हाडी, कोळी, आगरी, माणदेशी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोकणी या प्रमुख बोलीभाषा आहेत.

२००० वर्षांहून अधिकचा इतिहास, समृद्ध साहित्यपरंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ यामुळे मराठीच्या अभिजाततेचा दर्जा अधिक दृढ झाला आहे. आता या अभिजाततेचा उपयोग करून मराठीला जागतिक स्तरावर अधिक दृढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या कार्यात सर्व मराठी भाषकांचाही मोठा सहभाग असणार आहे.

संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेबद्दल अभिमानाने म्हटले आहे—

“माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके।”

या ओळींमधून त्यांनी मराठी भाषेची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेने जिंकणारी ही अक्षरे ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दांतून प्रकट झाली.

अशी ही आपली मराठी भाषा वैश्विक ज्ञानभाषा होण्यासाठी आपण सर्वजण सतत प्रयत्नशील राहूया!

०००

संकलन – युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button