प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सारस्वती जन्मभू: इंद्रपुरी – अमरावती

आठवडा विशेष टीम―

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखर यांनी ‘सारस्वती जन्मभूमी ‘ म्हणून या भूमीचा उल्लेख केलेला आहे. याच विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. तीच आजची अमरावती !….

येथील रिद्धपूर म्हणजे महानुभाव पंथीयांची काशी. या पंथांचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. (13 वे शतक) चक्रधर स्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेले धवळे हे एक सुंदर कथागीत महानुभावांच्या मठातून सामुहिकरित्या म्हटले जाते. सुमारे 17 व्या शतकात येथे एक विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण होऊन गेले. त्यांनी काही ग्रंथांची निर्मिती केली बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले.

संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले विदर्भ कवी म्हणजे देवनाथ महाराज (1754 – 1831). त्यांनी स्थापन केलेला मुख्य मठ अंजनगाव सुर्जी येथे आहे. या मठाचे पीठाधीश देवनाथ महाराज आणि त्यानंतरचे दयाळनाथ महाराज हे आख्यानक कवी होते त्यांनी अनेक प्रसादिक कवितेची निर्मिती केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीतल्या अनेक लेखकांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. अमरावतीला डेप्युटी कमिशनर या पदावर कार्यरत असलेला (1857-58) कर्नल फिलिप मेडोज टेलर या इंग्रज अधिकाऱ्याने ‘ कन्फेशन ऑफ ए ठग ‘ हा ठगांच्या जीवनमानावर खळबळजनक ग्रंथ लिहिला होता.

पंडित विष्णुपंत पाळेकर यांनी अप्रबुद्ध या टोपण नावाने ‘ब्रम्हर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र’ हा ग्रंथही अमरावतीला वास्तव्याला असतानाच लिहिला होता. (१९२६) मृगेंद्र शंकर स्वामी हे लिंगायत पंथाचे गुरु. कन्नड व मराठी या दोन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठीतून अभंग व पद रचना केली आहे. विविध ज्ञान विस्तार हे महाराष्ट्रातले एके काळचे खूप प्रसिद्ध मासिक होते (१८६७ – १९३७). फार महत्त्वाचे लेखन म्हणून या मासिकाने अमरावतीच्या बजाबा रामचंद्र प्रधान या लेखकाची नोंद घेतली आहे. रामकृष्ण जठार हे त्यांचे समकालीन लेखक होते. कविता, नाटक आणि भाषांतरे ही मोलाची कामगिरी या दोघांनी करून ठेवली आहे.

अमरावतीच्या सरकारी हायस्कूलमध्ये शिकवून अथवा शिकून पुढे लेखक म्हणून नावारूपास आलेल्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. प्रसिद्ध नाटककार विष्णू मोरेश्वर महाजनी, रघुनाथ तळवलकर, श्रीराम जठार, गणेश गोरे, गंगाधरपंत सबनीस हे येथील मुख्याध्यापक/शिक्षक होते. मोरोपंत जोशी, इतिहास संशोधक या. मा. काळे आणि य. खु. देशपांडे, ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर, कादंबरीकार बा. सं. गडकरी, आ. रा. देशपांडे उर्फ कवी अनिल, बा.ग. खापर्डे हे या शाळेचे विद्यार्थी होते. अनिलांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यासुद्धा अमरावतीच्याच.

वरुड येथील वखरे घराण्याने इसवी सन 1634 पासून पुढे 250 वर्षे हस्तलिखित स्वरूपात सातत्याने लेखन केले आहे. ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ या नावाचा खळबळजनक ग्रंथ लिहिणारे स्वामी शिवानंद वरुड तालुक्यात राहायचे. या ग्रंथावरूनच आचार्य अत्रे यांना ‘ब्रह्मचारी’ हे नाटक लिहिण्याचे प्रेरणा झाली असे म्हणतात. येथीलच गणपत देशमुख या कवीला इंग्रज शासनाच्या विरोधात कविता लिहितो म्हणून अटक झाली होती.

अमरावतीला नाटककार यांचे गाव म्हणतात ते खोटे नाही. महाराष्ट्रातील नामवंत नाट्यसंस्थांचा येथे महिना महिना मुक्काम असायचा. संपूर्ण जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने नाट्यरसिक नाटके बघायला यायची. वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, विद्याधर गोखले, बाळकृष्ण मोहरील, नानासाहेब दिघेकर असे अनेक विख्यात नाटककार या भूमीने जन्माला घातले आहेत.

या नाटककारांवर आणि महाराष्ट्रातल्या नाट्यसंस्थांवर दादासाहेब खापर्डे (१८५४ – १९३८) यांचा वरदहस्त होता. लोकमान्य टिळकांचे ते सहकारी होते. त्यांनी पुस्तके लिहिली नसूनही त्यांचा नाट्यक्षेत्रात इतका दबदबा होता की पहिल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत (नाशिक, २८ ऑगस्ट १९०५). बालगंधर्वांचे बालपण येथल्या खापर्डे वाड्यात गेले आहे. वीर वामनराव जोशींनी इंग्रज सरकार विरोधात लिहिलेल्या नाटकावर बंदी आली होती. दीनानाथ मंगेशकर यांनी महाराष्ट्रभर त्यांची नाटके गाजवली. विद्याधर गोखले यांनी संगीत नाटकांना जी अवकळा आली होती, त्यांना पुनर्जीवित केले. सुप्रसिद्ध साहित्यिक विश्राम बेडेकर जन्माने अमरावतीचेच. चित्रपट, नाटक आणि साहित्यलेखनातली त्यांची कारकीर्द बहुतेकांना ज्ञात आहे.

अमरावती जिल्हा हा साहित्य आणि संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, ना. कृ. दिवाणजी, काकासाहेब सहस्त्रबुद्धे, वि. रा.हंबर्डे, राज सरंजामे, डॉ भगवानराव म्हैसाळकर, मा. ल. व्यवहारे, पु. य. देशपांडे, कृष्णाबाई खरे.अ. तु. वाळके, जा.दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, भाऊसाहेब असनारे, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर, विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तुत्वाने एक काळ गाजवला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या लेखनाची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. संत गाडगेबाबा यांचे शिक्षण झाले नसले तरीही त्यांच्या नावे आज अमरावती विद्यापीठ स्थापन झाले आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही गुलाबराव महाराजांनी प्रचंड साहित्य संपदा कशी निर्माण करून ठेवली असेल याचा अचंबा वाटतो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक फार मोठी साहित्यिकांची पिढी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली. लेखकांचे प्रेरणास्थान डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी संस्थेमुळे अनेकांना शिक्षण घेता आले. इथल्या सरकारी विदर्भ महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक कार्यरत होते. डॉ. वि. भि. कोलते, नातू बाई, शंकर वैद्य, कथाकार शांताराम, रा.ग. जाधव आदी लेखक कवी येथे प्राध्यापक होते. नंतरच्या पिढीतले आपल्या आगळ्यावेगळ्या कवितांनी आणि गद्य लेखनाने एकूण मराठी साहित्यावर आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे वसंत आबाजी डहाके आणि कवयित्री प्रभा गणोरकर, लेखिका सुशीला पाटील, समीक्षक विवेक गोखले आणि प्राचार्य विजया डबीर, डॉ. मधुकर आष्टीकर यांनीसुद्धा येथे प्राध्यापकी केली आहे. वसंत आबाजी डहाके यांनी नाट्यधर्मी नावाची नाट्यसंस्था स्थापन करून अनेक नाटकांचे प्रयोग केले होते.

सुप्रसिद्ध साहित्यिक ‘धग’ कार उद्धव शेळके, ‘माणूस’ कार मनोहर तल्हार, अभंगकार आणि ललित लेखक मधुकर केचे, कथाकार दे. गो. उदापुरे, कवी तुळशीराम काजे, प्राचार्य राम शेवाळकर, वऱ्हाडीतून अभंग लिहिणारे शरदचंद्र सिन्हा, कथाकार वामन प्रभू,आणि विख्यात कवी गझलकार सुरेश भट इ. साहित्यिकांचे लेखन चिरंजीवी ठरले आहे.

अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, वनिता समाज, नगर वाचनालय आणि तपोवन या दोन संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये अनेक साहित्य विशेष कार्यक्रम राबवले गेले आहेत. येथून एके काळी रंग आणि धारा नावाचे दर्जेदार मासिके प्रकाशित होत असत. महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक त्यांत लेखन करीत असत. इथल्या महाराष्ट्र प्रकाशन संस्थेने अनेक थोरामोठ्या साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. अमरावतीत आजही अनेक प्रकाशन संस्था कार्यरत आहेत. येथल्या पॉप्युलर बुक डेपोमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व नामवंत प्रकाशनाची पुस्तके उपलब्ध असतात.

१९७० च्या दशकात अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक साहित्यिकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर वाकोडे, जनसाहित्य ही संकल्पना राबवून अनेकांना आपल्या अक्षर वैदर्भी या मासिकातून लिहिते करणारे डॉ. सुभाष सावरकर, अगदी वेगळ्या धाटणीची कविता लिहिणारे देवानंद गोरडे, राजकीय व्यक्ती असल्या तरीही कविता लेखन करणाऱ्या उषाताई चौधरी आणि प्रकाशदादा चौधरी, निसर्गलेखक श्याम देशपांडे, कादंबरीकार डॉ. रमेश अंधारे, प्रा. श्याम सोनारे, प्रा. कृष्णा चौधरी, प्रा.माणिक कानेड, केशव बोबडे, पद्माकर निमदेव, गो. ल. रडके, गीत गोविंदकार मनोहर कवीश्वर, कवयित्री कविता डवरे इ. साहित्यिकांच्या या पीढीने भरभरून लिहिलेले आहे. तदनंतरच्या पिढीत इतके साहित्यिक निर्माण झाले आहे की साऱ्यांची नोंद घेणे शक्य नाही.

लेखनाचे सर्व प्रकार हाताळून शंभरावर पुस्तके लिहिणाऱ्या आणि तितकेच पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले, अनेक संस्थांचे पदाधिकारी असलेले ग्रामीण कथाकार डॉ सतीश तराळ, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, भावगर्भ कविता लिहून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारे बबन सराडकर, मराठी साहित्याला अभंगांची अप्रतिम देण देणारे डॉ. सुखदेव ढाणके, कथा आणि ललित लेखिका मुक्ता केचे, विशेष शैलीकार कवी रमेश मगरे, कथा, कादंबरी आणि कविताकार राम देशमुख, तीव्र सामाजिक जाणीवेच्या कविता लिहिणारे प्रा. अशोक थोरात, कथाकार सुरेश आकोटकर आणि कवयित्री डॉ. रेषा, डॉ. कुमार आणि विद्या बोबडे, बहुआयामी लेखन करणारे खडू शिल्पकार डॉ. राज यावलीकर, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. शोभा रोकडे, कवयित्री रजनी राठी, कवी आणि गझलकार विष्णू सोळंके, कवी आणि कथाकार निळकंठ गोपाळ मेंढे, कवी आणि नाट्य अभिनेते तात्या संगेकर आणि अनुराधा संगेकर, नाटककार डॉ. सतीश पावडे, कवी कादंबरीकार मनोहर परिमल, डॉ. नरेश काठोळे, डॉ. मोना चिमोटे, भालचंद्र रेवणे, मयुरा देशमुख, सुरेश शुक्ल, विनोदी लेखक जनार्दन दातार, डॉ. गोविंद कासट, डॉ सुभाष गवई, डॉ. शोभा गायकवाड, गजानन देशमुख, डॉ. अजय खडसे, अनिल जावळे, पक्षीमित्र आणि निसर्गमित्र प्र. सु. हिरूरकर इ.

आज एक तरुण पिढी आपापल्या साहित्यविशेष क्षेत्रात दमदारपणे वाटचाल करीत आहे. डॉ. अशोक पळवेकर, सुनील यावलीकर, गझलकार नितीन भट, गझलकार अनिल जाधव, सौ. सुलभा गोगरकर, प्रीती बनारसे, प्रमोद चोबितकर, अनिल जवंजाळ, संजय खडसे, प्रा. अनिल प्रांजळे, दिगंबर झाडे, विशाल मोहोड, संदीप गावंडे, नितीन देशमुख, पवन नालट, राजेश महल्ले इ.

येथील हिंदुस्थान, जनमाध्यम, मातृभूमी आणि नागपूरहून निघणाऱ्या तमाम मराठी दैनिकांनी लेखकांच्या लेखनाला प्रसिद्धी देऊन साहित्यसेवेचे मोलाचे कार्य केले आहे. काही संस्थामार्फत पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात आणि साहित्य संमेलने भरवली जातात. मराठी प्रमाणेच हिंदी आणि उर्दूमध्ये लेखन करणारे बरेच साहित्यिक या मातीत जन्मले, रुजले आणि त्यांनी भरभरून साहित्यसेवा केली आहे. हिंदीमधून आपल्या ग्रंथसंपदाची निर्मिती करणारे भगवान वैद्य ‘प्रखर’ यांनी अनेक मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे हिंदी भाषेतून अनुवाद प्रकाशित केले आहेत. तेलगू लेखिका सुजनादेवी आचार्य यांनी सुप्रसिद्ध लेखक जयंत नारळीकर यांच्या एका कादंबरीचा तेलगू भाषेत अनुवाद केला आहे. कविवर्य सुरेश भट यांना उर्दूचे धडे देणारे वली सिद्दीकी हे अमरावतीचेच. साहित्य, संगीत, नाटक अशा विविध सांस्कृतिक क्षेत्रात अमरावती जिल्ह्याने दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्याचाच हा धावता आढावा!

०००

सुरेश आकोटकर, अमरावती, भ्रमणध्वनी 9967897975, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button