Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 31 : फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
फ्रेंच कंपन्यांच्या राज्यातील गुंतवणूकीबाबत यावेळी चर्चा झाली.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, फ्रान्सबरोबर विविध क्षेत्रात सहकार्यपूर्ण संबंध प्रस्थापित झालेले आहेत. महाराष्ट्रात उद्योग उभारण्यास पुढाकार घेणाऱ्या कंपन्यांना उद्योग उभारणीसंदर्भात सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. उद्योगांच्या अपेक्षांनुसार त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. फ्रेंच शिकण्याकडे ओढा असणा-यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यादृष्टीने शिक्षण क्षेत्रामध्येही काही सहकार्यपूर्ण उपक्रम घेता येतील असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन म्हणाले, भारतात अनेक फ्रेंच कंपन्या कार्यरत आहेत. फ्रान्समधील अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्र सक्षम राज्य आहे. फ्रान्स आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहे. पायाभूत सुविधा, बंदरे तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे लेनेन यांनी सांगितले.
0000