भारतीय सागरी विद्यापीठात करियरचे विविध पर्याय उपलब्ध

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नागपूर दि. 17 : समुद्र व त्याच्याशी निगडीत जहाज बांधणी, प्रशिक्षण, व्यवस्थापन असे विविध कोर्सेस उपलब्ध करुन देणाऱ्या चैन्नई स्थित भारतीय सागरी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी अर्ज मागविण्यात येत असून १४ मे ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. तर अध्यापकांच्या  २६ जागांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहेत. या दोन्हीही संधीचा विदर्भातील विद्यार्थी व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि करियरच्यादृष्टीने महत्वाच्या व वेगळ्या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरु मालिनी शंकर यांनी केले आहे.

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेश आणि अध्यापकांच्या भरावयाच्या पदांबाबत श्रीमती शंकर यांनी माध्यमांना आज माहिती दिली. सागरी विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांला विदर्भातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन करियरसाठी नवा पर्याय निवडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यापीठाचे कोची, मुंबई, नवी मुंबई, कोलकत्ता, चेन्न्ई, विशाखापट्टनम येथे कॅम्पस असून येथे ३ हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. एकूण १७ खाजगी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत व त्यांची क्षमताही ३ हजार विद्यार्थ्यांची असल्याचे श्रीमती शंकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक सत्रासाठी १४ मे पर्यंत अर्ज करता येणार ; सत्राला १० जूनपासून सुरुवात

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी १४ एप्रिल पासून अर्ज मागविण्यात आले आहेत. १४ मे पर्यंत अर्ज करता येणार असून १० जूनपासून नवीन सत्रास प्रारंभ  होणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक पध्दतीचे अभ्यासक्रम या विद्यापीठाद्वारे चालविण्यात येतात. तांत्रिक अभ्यासक्रमांत बी.टेक आणि एम.टेक हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. यासाठी इयत्ता १२ वी मध्ये (पीसीएम गृप) किमान ६० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास पात्र राहतील. बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतून किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील. तर एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतून किमान ५५ टक्के गुणांनी पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरतील.            

अध्यापक पदांच्या २६ जागांसाठी ४ मे पर्यंत अर्ज करता येणार

विद्यापीठाने सहयोगी प्राध्यापक पदांच्या १४ जागांसाठी तर सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १२ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. समुद्र अभियांत्रिकीच्या  ७ आणि नॉटीकल सायन्सच्या ७ अशा एकूण १४ सहयोगी  प्राध्यापकांच्या जागा आहेत. यातील ७ जागा आरक्षित तर उर्वरित ७ जागा अनारक्षित आहेत. समुद्र अभियांत्रिकीच्या  6 आणि नॉटीकल सायन्सच्या 6 अशा एकूण 12 सहायक प्राध्यापकांच्या जागा आहेत. यातील ७ जागा आरक्षित तर उर्वरित 5 जागा अनारक्षित आहेत. या पदांसाठी ४ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील. नवी मुंबई, चेन्नई, विशाखापट्टनम आणि कोची येथे कॅम्पस डायरेक्टरच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४ जागांसाठी अर्जही मागविण्यात आले असून २ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

विविध अभ्यासक्रमांसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांबाबत आणि अध्यापक पदांच्या जागांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.imu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही श्रीमती शंकर यांनी सांगितले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.