प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सारस्वती जन्मभू : आदिपर्व

आठवडा विशेष टीम―

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखरने ‘सारस्वती जन्मभू’ म्हणून या भूमीला प्रशस्तिपत्र बहाल केले आहे. मराठी भाषेची जननी म्हणूनही तिचा उल्लेख करण्यात येतो.

काळ कुणासाठी थांबत नाही. गतकाळाची पुनरावृत्तीही होत नाही. या काळाच्या विशाल पडद्यावर अनेक ऋषिमुनी आणि लेखक कवी आपल्या शब्दांची अक्षरनोंद ठेवून व आपले अस्तित्व चिरंजीव करून पडद्याआड निघून जातात. वाचकांच्या हाती उरतो तो या आठवणीतील अक्षरांचा अमोल ठेवा… विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. एके काळची संपन्न आणि विख्यात नगरी म्हणजे इंद्रपुरी म्हणजेच अमरावती. तिच्या प्राचीनतेच्या खुणा आज जागोजागी आढळतात. ऋग्वेदातील काही सूक्तांचा द्रष्टा आणि आर्यपुरुष अगस्ती ऋषी यांची पत्नी विदर्भ राजकन्या लोपामुद्रा, नळराजाची राणी दमयंती, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी आणि दशरथ राजाची आई इंदुमती येथल्याच मातीत जन्मल्या. या चारही विदर्भकन्यांचा इतिहास अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर तहसीलीतील ‘कौडिण्यपूर’ या एकेकाळच्या विदर्भाच्या राजधानीच्या नावाने जगाला ज्ञात आहे.

सालबर्डी

याच जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रम्य कुशीत सालबर्डी वसली आहे. येथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. सीता इथेच आश्रयाला होती. लव-कुश ह्याच ठिकाणी वाढले अणि राम-सीतेचे पुनर्मिलन येथेच झाले, अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधरस्वामींनीही येथेच तप केले होते.

येथले रिद्धपूर म्हणजे महानुभावपंथीयांची काशी. या पंथाचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. त्यांच्याकडून चक्रधर स्वामींनी ज्ञान प्राप्त केले आणि महानुभाव पंथ पुरस्कृत केला. (तेरावे शतक) अनेक पुरोगामी तत्त्वांची बांधिलकी स्वीकारलेला हा पंथ येथूनच पुढे भारतभर पसरला. चक्रधरस्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा चक्रधरांच्या स्तुतीपर लिहिलेला अभंग लीळाचरित्रात आहे. तद्वतच ‘धवळे’ हे तिचे एक सुंदर कथागीत असून गेयता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आजही महानुभावांच्या मठातून हे धवळे सामूहिकरित्या म्हटले जाते. देश-विदेशातील संशोधक आजही रिद्धपूरला येत असतात.

राजज्योतिषी कृष्ण:

या भूमीत अंदाजे सतराव्या शतकात एक प्रसिद्ध ज्योतिष घराणे होऊन गेले. या घराण्यातला विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण याने काही ग्रंथांची निर्मिती केली. बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले. त्यावेळचा राजा जहांगीर याने त्याला आपल्या दरबारात राजज्योतिषी म्हणून मानाचे स्थान दिले.

सुर्जी-अंजनगाव

साहित्याचा अभिजात वारसा मिळालेले एक गाव सुर्जी अंजनगाव. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतले विदर्भकवी श्री देवनाथ महाराज (इ.स. १७५४-१८३१) हे अंजनगावचेच. श्री. राजेश्वरपंत कमाविसदार यांच्या कुळात सुर्जी येथे ‘देवराज’ जन्माला आले. त्यांना कुस्त्यांचा भारी शौक. ‘निरुद्योगी’ म्हणून घरी आईशी व मोठ्या बंधूशी भांडण झाले. त्यामुळे ते सुर्जीच्या हनुमान मंदिरात गेले आणि ध्यान लावले. योगायोगाने या २७ वर्षांच्या ब्रह्मचारी देवरावांची संत एकनाथांच्या संप्रदायातील तेरावे पुरुष श्री गोविंदनाथ यांच्याशी गाठ पडली. गोविंदनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला.

आणि त्यांचे ‘देवनाथ’ हे सांप्रदायिक नाव ठेवले. तेव्हापासून त्यांचा काव्यप्रवास आणि कीर्तने यांना प्रारंभ झाला. या निमित्ताने ते भारतभर फिरले. संत नामदेव महाराजानंतर पंजाबात जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य श्री देवनाथांनीच केले. अनेक ठिकाणी आपले मठ स्थापन केले. आज मुख्य मठ सुर्जीला आहे.

श्री देवनाथ महाराज या मुख्य पीठावर विराजमान झाले. त्यांच्यानंतरचे पीठाधीश श्री दयाळनाथ महाराज हेही श्रेष्ठ प्रतीचे आख्यानक कवी होते. त्यानंतरच्याही पीठाधीशांनी काव्यरचना केल्या. श्री देवनाथ व श्री दयाळनाथ यांची कविता प्रासादिक आहे. द्रौपदीचा कृष्णासाठीचा धावा दयाळनाथ या शब्दांत बद्ध करतात- ‘ये धावत कृष्णा बाई अति कनवाळे निज जन मन सर समराळे.’ हृदय हेलावून टाकणारी अशी ही रचना आहे. श्री दयाळनाथांचे निधन वयाच्या ४८ व्या वर्षी (इ.स.१८३६) हैद्राबाद येथे झाले. श्री देवनाथांच्या निधनाची कथा मात्र मती गुंग करून टाकणारी आहे. रामनवमीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला ते कीर्तन करण्यासाठी गेले. अपार गर्दीत त्यांनी कीर्तन सुरू केले. एवढ्यात मंडपाला आग लागली. शेकडो लोक मारले गेले. देवनाथ महाराज बाहेर पडणार तोच कुणीतरी त्यांना कुत्सितपणे म्हणाले, ‘नैन छिन्दती शस्त्राणी, नैन दहती पावक.’ हे ऐकून देवनाथांनी त्या इसमाला घट्ट पकडून ठेवले आणि त्याच्यासोबतच ते अग्निदेवतेच्या स्वाधीन झाले. श्री देवनाथांची समाधी ग्वाल्हेरला आहे अन् त्यांनी स्थापित केलेला मठही तेथे आहे.

अमरावती : काही वेधक नोंदी

अमरावती हे नाटककारांचे गाव आहे, तसेच ते नाट्यवेड्यांचे गाव आहे. नामवंत कंपनींची नाटके अमरावतीला आली की ती पाहण्यासाठी दूरदूरून नाटकांचे रसिक येत. छकडा, पायटांगी व सायकल ही त्यावेळची वाहने. काही श्रीमंत व्यक्ती घोडा वा घोडागाडी वापरत. जमेल त्या वाहनाने माणसे येत. रात्रभर नाटकांचा आस्वाद घेत. त्या काळची नाटकंही ‘रात्रीचा समय सरूनी येत उषःकाल हा…’ अशा स्वरूपाची असत.

अमरावती लेखक-कवींचेही गाव आहे. या शहराने महाराष्ट्राला ‘साहित्य-सोनियाच्या खाणी’ दिल्या आहेत. मराठी कवितेला मुक्तछंद देणारे कवी अनिल येथेच शिकले. कुसुमावती देशपांडेही येथल्याच. कुसुमावतींचे वडील जयवंत कविता लिहीत. शालेय जीवनापासूनच कुसुमावती येथल्या साहित्य विशेष आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत. ‘कुसुमानिल’ यांचे प्रेम येथेच फुलले.

बेडेकर इथलेच

विश्राम बेडेकर यांचा जन्म अमरावतीचाच. त्यांची नाटक व चित्रपटातील कामगिरी सर्वांना परिचित आहे. ‘ब्रह्मकुमारी’ हे त्यांचे पहिले नाटक दि.१५/६/१९३३ रोजी रंगभूमीवर आले. (संगीत- मास्टर दीनानाथ) त्यानंतर त्यांनी मोजकेच लेखन केले. त्यांच्या वास्तव्यातली अमरावती, विदर्भ महाविद्यालय, मित्रमंडळी आणि येथे भोगलेले दारिद्र्य… या साऱ्या आठवणी त्यांनी आपल्या आत्मचरित्र ग्रंथातून (एक झाड दोन पक्षी) मांडल्या आहेत. बेडेकरांचे वडील रेल्वे स्टेशन परिसरातील आळशी राममंदिराचे पुजारी होते.

कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, बा. सं. गडकरी, ना. कृ. दिवाणजी, दादासाहेब आसरकर, डॉ. श्री. व्यं. केतकर, काकासाहेब सहस्रबुद्धे. वि. रा. हंबर्डे, रा. द. सरंजामे, डॉ. भवानराव म्हैसाळकर, मा. ल. व्यवहारे, पु. य. देशपांडे, खापर्डे बंधू, वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, कृष्णाबाई खरे, अ. तु. वाळके, जा. दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, तात्यासाहेब सबनीस, भाऊसाहेब असनारे, अप्रबुद्ध, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर, विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तृत्वाने आपला काळ गाजवला आहे. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, श्लोक, अभंग आणि इतर लेखन यांची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. त्यांचे एकूणच लेखन चिरंजीवी ठरले आहे.

वाचता वाचता

जुन्या लेखनकर्तृत्वाचा धांडोळा घेताना काही संस्मरणे वाचनात आली.

सुप्रसिद्ध कादंबरीकार बाळकृष्ण संतुराम गडकरी, यवतमाळचे यशवंत खुशाल देशपांडे आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे तिघेही जिवाभावाचे मित्र होते. ते एकाच शाळेत शिकत. नगर वाचनालयात ग्रंथवाचन करीत आणि मराठी वाङ्‌मयावर चर्चा घडवत.

सुप्रसिद्ध कादंबरीकार गीता साने अमरावतीतली १९२६ मध्ये प्रथम श्रेणीत मॅट्रिक होणारी पहिली मुलगी. सायन्स कॉलेजचीही पहिली विद्यार्थिनी. लग्नानंतर आडनाव न बदलविणारी पहिली मराठी लेखिका ! उत्तर प्रदेश व बिहारमध्ये स्त्री-शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली विदर्भकन्या !

कवी गणपतराव देशमुख हे स्वामी शिवानंद नावाने ओळखले जायचे. अमरावती नगरपालिकेत ते लिपिक होते. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध कविता रचल्यामुळे १९०७ साली त्यांना सात वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली होती. परंतु पुढे वऱ्हाडात पाय ठेवू नये, या अटीवर त्यांना मुक्त करण्यात आले. कविता लेखनामुळे तुरुंगात जाणारा हा पहिलाच वैदर्भीय कवी असावा.

डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी लेखन केले नसले तरी ते अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होते. डॉ. वि. भि. कोलते यांनी आपल्या आत्मचरित्रात (अजूनि चालतोचि वाट) भाऊसाहेबांच्या अनंत उपकारांचे स्मरण मोठ्या हृद्यतेने केले आहे. भाऊसाहेबांबद्दल एक विशेष माहिती मिळाली. त्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत Panjab ऐवजी Punjab लिहिणे योग्य वाटत नसे. कुणी असे लिहिल्याचे लक्षात आले की ते नावातल्या ‘यू’ अक्षराचा ‘ए’ करीत.

सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक गजानन जागिरदार अमरावतीलाच चौथीपर्यंत शिकले. सुप्रसिद्ध नाटककार जयराम केशव ऊर्फ भाऊसाहेब असनारे यांनी आपले आयुष्य संगीत नाटकांना वाहून टाकले. आजही असनारे घराण्याची आजची पिढी संगीत, वादन आणि गायन या क्षेत्रात नाव मिळवित आहे. परंतु आज हे कुटुंब सांगलीला स्थायिक झाले आहे.

दादासाहेब खापर्डे ह्यांनी हिराबाई बडोदेकरांना ‘गानकोकिळा’ पदवी अमरावतीलाच प्रदान केली होती.

पूर्वी राजकमल चौकात ‘महाराष्ट्र प्रकाशन’ या नावाची सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था होती. या प्रकाशनाने आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी इ. नामवंत लेखकांची काही पुस्तके एका काळात प्रकाशित केली होती. कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी ‘जयध्वज’ नावाचे नाटक लिहून त्याचा पहिला प्रयोग १९०५ च्या सुमारास अमरावतीला केला होता. विख्यात लेखक रा. भि. जोशी हे अमरावतीला शिकले आणि काही वर्षे अमरावतीच्या डेप्युटी कमिशनरच्या ऑफिसात नकलनवीस म्हणून काम केले. ह.भ.प. ल. रा. पांगारकर हे काही काळ अमरावतीला शिक्षक होते. डॉ. श्री. व्य. केतकर हे त्यांचे विद्यार्थी. अमरावतीच्या एके काळच्या साहित्य आणि सांस्कृतिक जीवनाचा हा धावता आढावा.

लेखक सुरेश अकोटकर (भावचित्रे )

अमरावती

The post सारस्वती जन्मभू : आदिपर्व first appeared on आठवडा विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button