प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 26 : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह  नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. मागील बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठविण्यात आली होती. या पथकाने नोंदविलेल्या सूचना व त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता. मात्र, प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. गर्दीचे व्यवस्थापन, घाटांची संख्या, रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीचे नियोजनही या आराखड्यात असावे. नाशिक त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढविण्यात यावा. तसेच या रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा. नाशिक शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करता येईल का याचा ड्रोन सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रस्ते मार्गांचे बळकीटकरण करावे

सिंहस्थसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. कुंभ काळात नाशिक शहरात वाहने सोडण्यात येऊ नये. भाविकांसाठी वाहनतळ ते शहरात प्रवासासाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच या ई बस प्रत्येक तीन मिनिटांना सुटतील असे नियोजन करावे. तसेच शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठी जागा वाढविण्यात यावी. तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांचे लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

रेल्वे प्रशासनासाठी समन्वय साधून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक रोड, इगतपुरी, कसारा आदी स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

धार्मिक कॉरिडॉर निर्माण करावे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे. नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तासह इतर कुंडांच्या सौंदर्यीकरण केल्यास भाविकांना तेथे जाता येईल. त्याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या शेजारील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ व्हावा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियोजन तसेच सर्व्हेलन्ससाठी जास्तीत जास्त ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा. ज्या भागातून जास्त गर्दी होते त्या रस्त्यांवर गर्दीच्या नियोजनासाठी व भाविकांना वेळ घालविता यावा, यासाठी त्या ठिकाणी डिजिटल कुंभसंदर्भातील प्रदर्शन तयार करावे. सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या लोगो निर्माण करण्यासाठी स्पर्धा घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

सन 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माहितीचे विश्लेषण करून पुढील कुंभमेळ्यासाठी कसे नियोजन करता येईल, याचा अभ्यास करावा. सिंहस्थ दरम्यान गोदावरी नदीचे पाणी वाहते राहिले पाहिजे, जेणेकरून भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येईल, यासाठी नियोजन करावे. तसेच साधुग्रामसाठी भूसंपादन, साधुग्राम व इतर महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रे, अग्निशमन सुविधा आदीसंदर्भातही सुयोग्य नियोजन करून आराखडा तयार करावे. तसेच कुंभ कालावधीत नागरिकांपर्यंत माहिती जलद गतीने मिळण्यासाठी संपर्क यंत्रणा (पब्लिक ॲड्रेस सिस्टीम) निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

कुंभमेळा कालावधीत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. तसेच कुंभ कालावधीत काम करणाऱ्या मनुष्यबळास प्रशिक्षण देण्यात यावे. कुंभमेळ्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यासाठीचे नियोजन करावे करण्याची सूचना जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केली.

०००

नंदकुमार वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button