Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
पालघर दि. २० : उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू ,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( टीमा) सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते यावेळी आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योगासाठी जमीन व शासनाच्या विविध परवानग्या लवकरात उपलब्ध होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ. बोईसर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये करणे याबाबतीत देखील राज्य शासन लवकरचं सकारात्मक निर्णय घेणार आहे. उद्योग वाढीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैढक घेऊन उद्योगांचे सर्व प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.
या उद्योगांमधून लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळतो. हे उद्योग वाढावेत यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, उद्योजकांन कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण जिल्ह्यामध्ये होऊ नये. अशा प्रकारच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिल्या.
उद्योगवाढीबरोबर रोजगार वाढणार आहेत. स्थानिक नागरिक, बेरोजगार स्थानिकांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना आवश्यक सर्व सहकार्य व सुविधा देण्याचे काम राज्य सरकार करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
०००